Published On : Fri, Aug 16th, 2019

‘महापौर चषक’ महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल स्पर्धा आजपासून

ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन सोमवारी : मनपा व एनडीबीए चे आयोजन

नागपूर : नागपूर महानगरपालिका व नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुले व मुलींच्या ‘महापौर चषक’ महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धेला उद्या शनिवारपासून (ता.१७) सुरूवात होत आहे. १७ ते २३ ऑगस्टदरम्यान आयोजित स्पर्धेचे सोमवारी (ता.१९) बजाज नगर येथील नुतन भारत युवक संघाच्या बास्केटबॉल कोर्टवर सायंकाळी सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील.

उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री नागो गाणार, प्रकाश गजभिये, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलींद माने, सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते व नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, बसपा पक्षनेता वैशाली नारनवरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेता दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्षनेता किशोर कुमेरिया, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा यादव, नगरसेवक लखन येरवार, नगरसेविका वनीता दांडेकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, उपायुक्त राजेश मोहिते, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजु भिवगडे, आयोजन समितीचे सचिव भावेश कुचनवार, एनडीबीए चे संयोजक वीरेंद्र रानडे यांची उपस्थिती राहिल.

मुले व मुलींच्या सबज्यूनिअर (१३ वर्षाखालील) व ज्यूनिअर (१८ वर्षाखालील) या दोन गटामध्ये ही स्पर्धा होईल. स्पर्धेमध्ये सुमारे दोन हजार खेळाडू सहभागी होणार असून सिव्हील लाईन्स येथील आमदार निवास येथे सर्व खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था मनपा व एनडीबीएच्या वतीने नि:शुल्क करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंची महाराष्ट्र राज्य ज्यूनिअर (मुले व मुली) आणि सबज्यूनिअर (मुले व मुली) बास्केटबॉल संघामध्ये निवड करण्यात येणार आहे.

मुले व मुलींच्या सबज्यूनिअर आणि ज्यूनिअर गटामध्ये सुमारे २५० सामने खेळविण्यात येणार आहेत. सर्व सामने नुतन भारत युवक संघ (एनबीवायएस) बजाज नगर कोर्टसह नागपूर ॲमेच्यूर स्पोर्ट्स असोसिएशन (नासा) सुरेंद्र नगर, शिवाजी नगर जिमखाना (एसएनजी) शिवाजी नगर, प्लेअर्स बास्केटबॉल जिमखाना (पीबीजी) गाडीखाना, पावनभूमी क्रीडा मंडळ (पीकेएम) पावनभूमी व गुरूदेव नगर क्रीडा मंडळ (जीकेएम) गुरूदेव नगर या बास्केटबॉल कोर्टवर ‘महापौर चषक’ महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धेचे सामने होतील. पावसाची शक्यता लक्षात घेता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात स्पर्धा घेण्यात येण्यात येतील.

स्पर्धेच्या आयोजनासाठी नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव भावेश कुचनवार यांच्यासह मनपा व एनडीबीएचे पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.