Published On : Fri, May 11th, 2018

‘बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक’; आठवीच्या पुस्तकात वादग्रस्त उल्लेख

Advertisement

नवी दिल्ली – ‘बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक’ असल्याचा उल्लेख राजस्थानमधील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्र विषयाच्या रेफरन्स पुस्तकात करण्यात आला आहे. या प्रकारावर सर्वत्र संताप व्यक्त असून अशा महान व्यक्तींविषयी अशा शब्दाचा वापर पुस्तकात करणे ही चिंतेची बाब आहे .

राजस्थानमधील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते इंग्रजी रेफरन्स बुकमध्ये अनेक ठिकाणी शब्दांची निवड चुकली आहे. पण टिळकांविषयी अशा शब्दाचा वापर असलेले पुस्तक विद्यार्थ्यांना दिले जावे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली. राजस्थानमध्ये शिक्षण मंडळातर्फे हिंदी भाषेतून पाठ्यपुस्तके छापली जातात. त्यामुळे सर्व इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांना रेफरन्स बुकचाच आधार घ्यावा लागतो. रेफरन्स बुक छापणाऱ्या प्रकाशकाने आम्ही राजस्थानमधील शिक्षण मंडळाच्या नियमानुसारच पुस्तके छापली आहेत, अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यांना दिली. राजस्थानसह सीबीएसई शाळांमध्येही आमची पुस्तकं जातात, असे त्याने नमूद केले. आता रेफरन्स बुकमधील या अक्षम्य चुकांची राजस्थानमधील सरकार दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये टिळकांविषयी वादग्रस्त उल्लेख आहे. ‘अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ’ या धड्यात टिळकांचा उल्लेख आहे. ‘टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात. ब्रिटीश अधिकाऱ्यांना विनंती करुन स्वातंत्र्य मिळणार नाही, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांना टिळक खुपत होते, असे पाठ्यपुस्तकात म्हटले आहे. हे पुस्तक मथुरेतील एका प्रकाशकाने छापले आहे. या पुस्तकावरुन वाद निर्माण झाला आहे.