Published On : Sun, Apr 2nd, 2023

राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाचे केंद्रीय मंत्री श्री. गडकरी अन् उपमुख्यमंत्री श्री. फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

उत्तम व्यवस्था अन् वास्तुशिल्पाकरिता मान्यवरांनी केले मनपाचे कौतुक

नागपूर, : नागपूर महानगरपालिकाद्वारे निर्माण करण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि राज्यांचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (१ ता.) रोजी करण्यात आले.

चिटणवीसपुरा, महाल येथे झालेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाच्या लोकार्पण प्रसंगी आमदार श्री. विकास कुंभारे, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. मोहन मते, माजी आमदार श्री. नागो गाणार, संजय भेंडे, माजी महपौर श्री. दयाशंकर तिवारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. नागपूर स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय गुल्हाने, मनपा शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर, सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक श्री महेश धमेचा, श्री.अभय बुराडे, श्रीमती. अल्का गावंडे, श्री. मनोज तालेवार, श्रीमती सुमेधा देशपांडे, श्रीमती नेहा वाघमारे श्री. राजू जाधव, श्री. विजय कडू, श्रीमती श्रद्धा पाठक यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक, व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

कार्यक्रमादरम्यान सर्वच मान्यवरांनी मनपाद्वारे तयार करण्यात आलेल्या या ई- ग्रंथालयाच्या उत्तम सोयी सुविधा आणि वास्तुशिल्पाचे कौतुक केले.

छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाची सुरुवात 1998 मध्ये तत्कालीन महापौर सुधाकर निंबाळकर यांनी केली होती. आमदार प्रवीण दटके यांनी पुढाकार घेत आता या ग्रंथालयाचे नूतनीकरण केले असून, चार मजली इमारतीत मुले व मुलींसाठी वेगवेगळया अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व आधुनिक सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले की, महाल परिसरात तयार करण्यात आलेले हे ई ग्रंथालय विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावने तयार करण्यात आलेले हे भव्य असे ई-ग्रंथालय सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असल्याचे सांगत श्री. गडकरी यांनी या ग्रंथालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र देखील तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री गडकरी म्हणाले की, कचरा मुक्त शहर,चांगले मैदान, वाचनालय,बाजारपेठा निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. यातच विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मनपा प्रयत्न करीत आहे. तसेच नागपूरच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध घटकाखाली एक हजार कोटी नागपूरला उपलब्ध केले आहे. केंद्र शासनासोबतच राज्य शासनाकडून विविध विकास कामांसाठी निधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याशिवाय शहरातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा व्हावा. याकरिता अमृत योजनेअंतर्गत शहरात विविध जलकुंभ निर्माण केल्या जात आहे. असे सांगत मनपाने केलेल्या कार्याचे श्री. गडकरी यांनी कौतुक केले.

याशिवाय ज्या श्री छत्रपती शाहु महाराजांनी संपूर्ण आयुष्य सामाजिक न्याय आणि शिक्षण याकरीता अतिशय मोलाचे कार्य आणि त्यांच्या मुळे अनेक वंचितांना शिक्षण घेता आले. आशा राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने हे राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालय तयार केल्या बद्दल उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिका तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

ते म्हणाले की, मनपाचे अतिशय कमी जागेत, अतिशय चांगल्याप्रकारे या ग्रंथालयाचे बांधकाम केले आहे. आधी असलेल्या वाचनालयाला नवीन स्वरूप देण्याचा आले आहे. जुन्या वाचनालयाला पूर्णतः बदलून ई-ग्रंथालय बनवून त्याला आधुनिक स्वरूपात आणण्याचे काम मनपाने केले आहे. याठिकाणी अभ्यासासोबत स्पर्धा परीक्षांचे वर्ग देखील भरविण्याचा मनपाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय नव्या थाटात लोकार्पण होत असतांना ज्यांना खरोखर गरज आहे अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची संधी याठिकाणावरुन मिळावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार श्री. प्रवीण दटके यांनी केले. या ग्रंथालयात संगणकासह विविध विषयांची पुस्तके उपलब्ध असून,विद्यार्थी 12 तास होऊन अधिक वेळ येथे अभ्यास करू शकतील असे श्री.दटके यांनी सांगितले. तर माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी नाममात्र शुल्कात विद्यार्थी येथील सोयी सुविधांचा लाभ घेऊ शकतील आणि पुस्तके वाचून नाविन्यपूर्ण माहिती आत्मसात करू शकतील असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमात सर्वप्रथम ग्रंथालयाचे लोकार्पण करण्यात आले यानंतर श्री. गडकरी आणि श्री. फडणवीस यांनी ग्रंथालयाचे अवलोकन केले. मनपाचे आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी श्री. नितीन गडकरी यांचे तर नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजय गुल्हाने यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मंजुषा फुलंबरकर यांनी तर आभार श्री. राजेन्द्र पुसेकार यांनी मानले.

असे आहे ई ग्रंथालय
नागपूर महानगरपालिकेच्या ग्रंथालय विभागाद्वारे शहरातील सर्व वयोगटातील नागरीकांकरीता वाचन साहित्य उपलब्ध करून देवून बैध्दिक विकास साधण्याकरीता विविध भागात ग्रंथालय व अध्ययन कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या तंत्रज्ञानाच्या काळात मनपातर्फे अत्याधुनिक स्वरूपाची ई-ग्रंथालय नागरीकांकरीता उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या नागपूर शहरात खालील ई-ग्रंथालयाचे म.न.पा. संचालन करीत आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-ग्रंथालय, लोधीपुरा. बाजीराव साखरे ई-ग्रंथालय, लष्करीबाग. ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ई-ग्रंथालय, जयताळा, प.पु. केशव बळीराम हेडगेवार ई-ग्रंथालय, महाल ई-ग्रंथालयाची श्रृंखला कायम ठेवत चिटणविसपुरा येथे राजर्षी छत्रपती शाहु महाराज ई- ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ग्रंथालयाच्या सुविधेचा लाभ होण्याच्या दृष्टीने ग्रंथालयाच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी नविन ४ मजली अत्याधुनिक इमारतीचे निर्माण करण्यात आले आहे.

प्रथम मजल्यावर ज्येष्ठ नागरीकांसाठी वाचन कक्ष व विरंगुळा केंद्राची व्यवस्था करण्यात आली असुन, या ठिकाणी वर्तमानपत्रे, मासिके वाचना करीता उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी सादरीकरण कक्ष असुन येथे विविध प्रकारच्या विषयावरील कार्यशाळा व परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर मुले व मुलीं करीता स्वतंत्र अभ्यासिका असुन येथे ५० विद्यार्थी व ५० विद्यार्थीनी अभ्यास करू शकतील अशी व्यवस्था आहे. तसेच यासोबतच संगणक कक्षाची निर्मिती करण्यात आली असुन येथे २२ संगणक High Speed Internet Connectivity सह पुरविण्यात आले आहे. येथे वातानुकुलित सुविधा असुन विविध स्पर्धा परिक्षेची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ग्रंथालयात प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा देण्यात आली असुन पिण्याच्या पाण्याची सुविधा होण्याच्या दृष्टीने प्रत्येक मजल्यावर फिल्टरसह वॉटर कुलर लावण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement