Published On : Thu, Aug 22nd, 2019

नागपूर शहरात प्रत्येक सिग्नलवर होणार ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ : महापौर नंदा जिचकार

Advertisement

मनपाचा पथदर्शी प्रकल्प : आग्याराम देवी चौकातील सिग्नलवर पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन

नागपूर : मार्च महिन्यात झालेल्या ‘मेयर इनोव्हेशन अवार्ड’मध्ये विजयी ठरलेल्या ‘सिग्नल आयलँड’ या संकल्पनेचा उपयोग करुन शहरातील सिग्नलवर ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ करण्याच्या प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेचा हा पथदर्शी प्रकल्प असून ‘ट्रू ग्रीन एनर्जी’च्या माध्यमातून शहरातील संपूर्ण सिग्नल, महामार्ग व अन्य ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येणार असून शहरातील प्रत्येक सिग्लवर ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ करण्यात येईल, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

संपूर्ण शहरात राबविण्यात येणा-या या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून ‘सिग्नल आयलँड’च्या पायलट प्रकल्पाचे गुरूवारी (ता.२२) आग्याराम देवी चौकातील सिग्नलवर महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, धंतोली झोन सभापती लता काडगाये, जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, प्रतोद दिव्या धुरडे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेविका चेतना टांक, नगरसेविका हर्षला साबळे, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, ‘ट्रू ग्रीन एनर्जी’चे अमित सरकार, मंगेश मेढेकर, गजानन आखरे, राजू गुहे, दिगंबर आमदरे, अश्वजीत गाणार, हेमंत वाघ, लिकेश पटेल आदी उपस्थित होते.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार व अन्य मान्यवरांनी आग्याराम देवी चौकातील सिग्नलवर प्रकल्पाचे भूमिपूजन केले.

यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता शहरातील शासकीय, निमशासकीय व खासगी मोठ्या इमारतींमध्ये ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ आवश्यक असल्याचा व त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेमध्ये घेण्यात आला. पावसाच्या पाण्याचे संकलन करून ते जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्याच्या प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्येही करण्यात आली आहे.

शहरतील रस्ते, महामार्ग आदी ठिकाणी पावसाचे पाणी थांबविण्याची अथवा ते जमिनीत मुरविण्याची कोणतिही व्यवस्था आपल्याकडे नाही. शहरातील महत्वाच्या समस्यांसाठी उपयुक्त ठरणा-या नवसंकल्पना ‘मेयर इनोव्हेशन अवार्ड’मध्ये मांडण्यात आल्या होत्या. त्यातूनच ‘सिग्नल आयलँड’ ही संकल्पना पुढे आली. रस्ते, महामार्गावरुन वाहणा-या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे, असा विश्वासही महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.