नागपूर: राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सोबतच वादळी वाऱ्याचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान पाऊस, गारपीट आणि वादळ असं तिहेरी संकट पुढील दोन दिवस राज्यावर असणार आहे.
महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भाला पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक, आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे. नागपुरातही
पावसाची हजेरी –
नागपुरात काल शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. शहरातील अनेक भागात हलका पाऊस झाला, तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसही झाला.नागपूर आणि विदर्भात २७ आणि २८ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्याअंतर्गत शुक्रवारी सकाळपासूनच विदर्भातील विविध जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. अकोला, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यांत सकाळपासून पावसाने हजेरी लावली. सायंकाळपर्यंत अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली.
त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. आजही नागपुरात ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे. नागपुरात काल सायंकाळी 5.30 वाजता पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला हलकासा रिमझिम पाऊस पडत होता, पण जसजसा रात्र जवळ येत गेली तसतसा पाऊस वाढत गेला. आठ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू झाला. वाडी, रवी नगर, शंकर नगर, सीताबर्डी, जैताळ, चिंचभवन, गोरेवाडा आदी भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.