Published On : Wed, Sep 25th, 2019

रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा वापरा आणि करात सवलत मिळवा!

पाणी संवर्धन आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून मनपाचे पाऊल : ३० नोव्हेंबरपूर्वी कर भरल्यास ४ टक्के सूट

नागपूर: भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून मनपाने स्तुत्य पाऊल उचलले आहे. रेन वॉटर हॉर्वेस्टिंग आणि सौर ऊर्जेच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वत:च्या घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावणाऱ्या आणि सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या नागरिकांना मालमत्तेच्या सामान्य करात सवलत देण्यात येते.

Advertisement

रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जेचा वापर, गांडूळखत, घनकचऱ्यापासून खत निर्मिती व वापर यासारखे पर्यावरणीय प्रकल्प जर नागरिक राबवित असेल तर त्यांना सामान्य करामध्ये पाच ते १० टक्के कर सवलत नागरिक प्राप्त करू शकता, अशी माहिती सहायक आयुक्त (कर आकारणी) मिलिंद मेश्राम यांनी दिली. यामध्ये नमूद केलेल्या प्रकल्पांपैकी जर एक प्रकल्प नागपूर शहरातील नागरिक राबवत असेल तर सामान्य करात पाच टक्के सवलत मिळेल.

एकापेक्षा अधिक प्रकल्प राबवत असेल तर सामन्य करामध्ये १० टक्के सवलत मिळेल. याशिवाय चालू वर्षाचा मालमत्ता कर ३० नोव्हेंबरपूर्वी अदा केला तर सामान्य कराच्या रक्कमेमध्ये चार टक्के सवलत मिळणार आहे. या पैकी जास्तीत जास्त पर्यावरणीय प्रकल्पांचा आपल्या मिळकतीमध्ये वापर करून आपल्या सामान्य करामध्ये सवलत प्राप्त करण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेले आहे. नागरिकांनी या मनपाच्या स्तुत्य उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसून येत आहे.

आतापर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी ६६३, सौर ऊर्जेचा वापरासाठी २०१३, गांडूळखत निर्मितीसाठी ४८, सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी ४३४ नागरिकांना आपल्या सामान्य करामध्ये सवलत प्राप्त झाली आहे.

नवीन बांधकाम करताना आता रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे. बांधकामाचा नकाशा मंजूर करताना आर्किटेक्टकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. याशिवाय मोकळे भूखंड, वापरात नसलेल्या मालमत्ता, रिक्त मालमत्ता याबाबत मालमत्ता धारकाने संबंधित मनपा झोनमध्ये संपर्क साधून कराचे मागणी देयके प्राप्त करावे व मालमत्ता कर नागपूर महानगरपालिकेच्या खात्यात भरावा. मालमत्ता कर नियमावलीमध्ये झालेल्या बदलानुसार नवीन मालमत्ता खरेदी केल्यास, नवीन बांधकाम केल्यास संबंधित झोनमध्ये मालमत्ता कर पुनर्निधारणसंबंधी कार्यवाहीची प्रक्रिया करून घ्यावी, असेही सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी सांगितले.

नागरिकांनी त्यांच्याकडे असलेला थकीत मालमत्ता कर लवकरात लवकर नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अथवा नागपूर महानगरपालिकेच्या कर वसुली केंद्रावर जाऊन थकीत मालमत्ता कर भरावा व मालमत्ता कर अदायगीअभावी होणारी लिलावाची कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या कर विभागाद्वारे करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement