नागपूर : मागील दोन दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाने पाठ फिरवली असून, वातावरणात उकाडा व असह्य उष्णता जाणवत आहे. शनिवारी नागपूरचे कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, जे सरासरीहून २.६ अंशांनी अधिक आहे. हवामान विभागाने आगामी सात दिवसांसाठी पावसाची फारशी शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सतत ढगाळ वातावरण असूनही पावसाचा मागमूस नसल्यामुळे नागपूरकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वातावरणातील दमटपणा आणि वाढलेले तापमान यामुळे नागरिक वैतागले आहेत.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत नाही-
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरात कोणताही प्रभावी कमी दाबाचा पट्टा निर्माण होत नसल्याने पावसाचे प्रमाण घटले आहे. याशिवाय, मान्सूनची मुख्य वारेरेषा उत्तर दिशेकडे म्हणजे हिमालयाच्या भागाकडे सरकली आहे, ज्यामुळे विदर्भात पावसाची स्थिती आणखी कमकुवत झाली आहे.
फक्त तुरळक ठिकाणी हलकी सरी शक्य-
या काळात काही ठिकाणी स्थानिक ढगांमुळे हलक्याफुलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, व्यापक किंवा जोरदार पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील सात दिवस तरी पावसाअभावी उकाड्याचे वातावरण कायम राहणार आहे.
पावसाअभावी खरीप हंगामावर परिणामाची भीती-
पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ऑगस्ट महिन्यातही पर्जन्यमान सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, याचा परिणाम खरीप पिकांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.