
महाराष्ट्र : राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असून मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले असतानाच अनेक भागांत अचानक पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईतील पवईसह काही भागांत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातही काही भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात बदल झाला आहे.
भंडारा जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला, तर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
मात्र, विदर्भातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज असून तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पावसातील खंडामुळे शेती पिकांवर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.




