Published On : Mon, Jul 22nd, 2019

लोहमार्ग पोलिस अद्यापही फरारच

Advertisement

महंताला माहारण केल्याचे प्रकरण

नागपूर : एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपूरात आलेल्या एका महंताला मारहाण करणारा लोहमार्ग पोलिस अद्यापही फरार आहे. लोहमार्ग पोलिस त्याचा कसून शोध घेत असून लवकरच तो पकडल्या जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेमुळे पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

प्रशांत पुंडलिक धोटे (३२, रा. पोलिस क्वॉर्टर, अजनी) असे मारहाण करणाºया पोलिस कर्मचाºयाचे नाव आहे. मागील तीन वर्षांपासून तो नागपूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. घटनेच्या दिवशी म्हणजे शनिवार २० जुलै रोजी तो नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुर्व प्रवेशव्दार अर्थात संत्रामार्केट परिसरात कर्तव्यावर होता. दरम्यान सोनभद्र उद्गम, सोनमुंडा, अमरकंठ मध्यप्रदेश निवासी महंत सोमेश्वर गिरी ब्रम्हलीन बारकेश्वरी गिरी (५८) हे शनिवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर आले.

रविवारी नागपुरात मानवाधिकारी संघटेच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी ते बरौनी एक्स्प्रेसने गोंदियाला आले. गोंदियाहून समता एक्स्प्रेसने रात्री ११ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. पूर्व प्रवेशव्दार परिसरात आॅटोरीक्षा करण्यासाठी जात असताना कर्तव्यावर असलेला पोलिस शिपाई प्रशांत याने महंत यांची तपासणी केली. बॅगमध्ये गांजा असल्याचा पोलिसाने संशय व्यक्त केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला जाताच पोलिसाने त्यांना मारहाण केली. पुर्व प्रवेशव्दाराजवळच त्यांचा हात मुरगाटला. त्यामुळे त्यांचा हात फॅक्चर झाला. एका महंताला मारहाण होत असल्याने प्रवासी आणि आॅटो चालकांची चांगलीच गर्दी झाली होती.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस शिपाई अजय मसराम आणि त्यांचे सहकाºयांनी लगेच जखमीला मेयो रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले. ही संधी साधून मारहाण करणारा पोलिस कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची गंभीरता लक्षात घेता लोहमार्ग पोलिसांनी मारहाण करणाºया पोलिसाविरूध्द कलम ३२४, ३२५, ५०४ आणि ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक गोंडाणे करीत आहेत. अद्यापही प्रशांतचा काही ठावठिकाणा लागला नाही. पोलिस त्याच्या शोधासाठी प्रयत्नशील आहेत. लवकरच तो पकडल्या जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.