Published On : Tue, Apr 23rd, 2019

रेल्वेने पशुंची तस्करी, मृतांचा खच

Advertisement

नागपूर रेल्वे स्थानकावर प्रकार उघडकीस, केंद्रिय मंत्री मेनका गांधी यांच्या कार्यालयाने घेतली दखल

नागपूर: थंडीत राहणाºया शेकडो पशुंना रेल्वेच्या पार्सल बोगीत अंत्यंत क्रुरतेने कोंबून तस्करी करणाºयाचा एका पशु प्रेमीच्या सतर्कतेने भंडाफोड झाला. केंद्रिय मंत्री मेनका गांधी यांच्या कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यामुळे लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफ जवानांनी नागपूर रेल्वे स्थानकावर पशुंची ही तस्करी उघडकीस आणली. विविध प्रजातीच्या जवळपास एक हजार पशुपैकी १०० च्या जवळपास पशुंचा मृत्यू झाला. घटनास्थळी वनविभाग, वेटर्नरी डॉक्टर, मानद पशु अधिकारी आणि पशुप्रेमी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

१२१०२ – ज्ञानेश्वरी कुर्ला एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीने या पशुंना मुंबईला घेऊन जात होते. पशु प्रेमी शुब्रतो दास (३६, रा. कोलकाता) हे याच गाडीने कोलकाता ते नागपूर असा प्रवास करीत होते. गाडीत बसण्यापूर्वीच लव बर्ड, कबुत्तर, पांढरे उंदिर, ससा आणि इतर पशुंचे एकून ९ बॉक्स (पिंजरे) मध्ये जवळपास हजार पशुंना कोलकात्याहून पार्सल व्हॅनमध्ये कोंबण्यात आले. याघटनेचा व्हिडिओ शुब्रतो यांनी फेसबुक वर टाकला तसेच केंद्रिय मंत्री मेनका गांधी यांच्या कार्यालयालाही माहिती दिली. या प्रकरणाची गांधी यांच्या कार्यालयाने तात्काळ दखल घेत नागपुरातील मानद पशु कल्याण अधिकारी अंजील वैद्यार यांना कळविण्यात आले. तत्पूर्वी फेसबुकच्या माध्यमातून नागपुरातील पशु प्रेमींनाही या प्रकाराविषयी माहिती मिळाली. लगेच वैद्यार यांनी लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफला एक पत्र देऊन या घटनेची माहिती दिली. तसेच मदत करण्याची विनंती केली.

घटनेची गंभीरता लक्षात घेता गाडी येण्यापूर्वीच सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रवि वाघ, हेड कॉन्स्टेबल अनिल कुवर, प्रमोद घ्यारे, परमानंद वासणिक, अपर्णा वलके, नाजनीन पठाण यांच्यासह आरपीएफ उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, सिंग आदी पथक फलाट क्रमांक ८ वर पोहोचले. सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस येताच पार्सल व्हॅनमधून पशुंचे ९ बॉक्स उतरविण्यात आले. यावेळी पशु प्रेमी संघटनांचे पदाधिकारी करिश्मा गिलानी, मानद पशु कल्याण अधिकारी अंजील वैद्यार यांच्या उपस्थितीत पशुंचे बॉक्स उतरविण्यात आले. जवळपास एक हजार पशुपैकी १०० च्या जवळपास पशुंचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यार यांनी दिली.

वनविभागाचे पथक
माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल रमेश आदमने यांच्यासह वेटरर्नरी डॉक्टर उष्मा पटेल घटनास्थळी पोहोचले. वृत्तलिहेपर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरू होता. कायदेशिर प्रक्रिया लोहमार्ग पोलिस करीत होते. लोहमार्ग पोलिसांकडून वनविभागाला सुपूर्द करण्यात येणार होते. मात्र, या पशुंना कोणाच्या स्वाधीन करायचे, यावर वृत्त लिहेपर्यंत निर्णय झाला नव्हता.