
नागपूर : नागपुरातील कामगार नगर परिसरात घराच्या आडून कथितरित्या अवैध कत्तलखाना चालवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कपिलनगर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संबंधित घरावर छापा टाकत तब्बल १९ गोवंशांची सुटका केली. या कारवाईत एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
कपिलनगर पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना कामगार नगर परिसरातील एका घरात मोठ्या संख्येने गोवंश बांधून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद साबिर मोहम्मद वशीर कुरेशी यांच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना १९ गोवंश दयनीय अवस्थेत बांधून ठेवल्याचे आढळून आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोवंशांना पुरेसा चारा-पाणी न देता ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळ सर्व गोवंशांची सुटका करून त्यांना धंतोली गोरक्षण केंद्रात सुरक्षितपणे पाठवले.
या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून कपिलनगर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश नेमके कुठून आणण्यात आले होते, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.



