मुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या एका गडद वास्तवात रूपांतरित होत चाललेल्या असून, या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी म्हणाले, “आकड्यांमधून शेतकऱ्यांचा दु:ख दाखवता येत नाही. हे ७६७ शेतकऱ्यांचे जीवन संपलेले कुटुंबे आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्या ऐवजी दरवर्षी वाढत आहेत. आणि सरकार त्याकडे लक्ष देत नाही.”
राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणावर घणाघाती टीका केली. “शेतकरी आज कर्जात बुडून, महागड्या बियाण्यांमुळे, खते आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे त्रस्त आहेत. यावर सरकार काहीच करत नाही. पण, श्रीमंत उद्योगपतींचे कोट्यवधी रुपये माफ केले जातात, हे सरकारच्या धोरणाचे द्योतक आहे.”
काँग्रेस नेत्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोदी सरकारच्या आश्वासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मोदीजींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, पण आज शेतकऱ्यांचे जीवनच निम्मे होत आहे,” असं राहुल गांधींनी म्हटलं.
त्यांनी अनिल अंबानींच्या ४८,००० कोटी रुपयांच्या कर्ज माफीचा मुद्दा उचलला आणि विचारलं की, “शेतकऱ्यांच्या आयुष्याला धक्का बसत असताना, सरकारकडून श्रीमंतांचे कर्ज माफ कसे होतं?”
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडून १ लाख रुपयांच्या मदतीची रक्कम वाढवण्याची काँग्रेस आमदारांची मागणी आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीला न्याय मिळवण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची गरज व्यक्त केली.