Published On : Sat, Jul 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

श्रीमंत रघुजी राजे नगर भवन ‘टाऊन हॉल’चे काम वेळेत पूर्ण करा

महापौर निता ठाकरे यांचे निर्देश
Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे शहराचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या महाल भागात उभारण्यात येत असलेल्या नवीन ‘श्रीमंत रघुजी राजे नगर भवन’ (टाऊन हॉल) च्या बांधकामासंदर्भात महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात शनिवारी (ता.11) आढावा बैठक पार पडली. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी निश्र्चित कालावधीत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच टाऊन हॉलच्या सर्व कामांबाबत कंत्राटदार, कन्सल्टंट, पीएमसी आणि अधिकारी यांनी एकमेकांशी उत्तम समन्वय साधून कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेडे, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, जलप्रदाय समिती उपसभापती विजय (पिंटू) झलके, नगरसेवक श्री. सुधीर (बंडू) राऊत, नगरसेवक श्री. दिलीप दिवे, नगरसेविका श्रीमती सुषमा चौधरी, श्रीमती वैशाली उदापूरकर, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, उपायुक्त श्री. गणेश राठोड, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचेटवार, श्री. राजेंद्र राठोड, प्रकल्प अभियंता श्री. राजीव गौतम, सहायक आयुक्त श्री. घनश्याम पंधरे, कंत्राटदार श्री. प्रफुल्ल देशमुख, पीएमसी प्रतिनिधी आणि मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकद्वारे महाल येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन श्रीमंत राजे रघूजीराव भोसले सभागृह (टाऊन हॉल) च्या नवीन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. ६८०८.१३ चौरस मीटर भूखंडावर उभारण्यात आलेली ही नवीन टाऊन हॉल इमारत २ तळमजले अधिक ४ मजले अशी आहे.

बैठकीत कंत्राटदार श्री. प्रफुल्ल देशमुख यांनी बांधकामाबाबतची सविस्तर माहिती सादर केली. त्यानंतर टाऊन हॉलसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा झाली. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी बांधकामात येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या व लवकरात लवकर बांधकामात झालेल्या सर्व बदलांचे ड्रॉईंग, वस्तूंच्या किमती, रेट ॲनालिसिस व इतर सर्व बाबींची माहिती प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.

Advertisement

मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी कंत्राटदार, पीएमसी आणि सल्लागार यांना येत्या दोन महिन्यांत अधिक गतीने काम करण्याचे निर्देश दिले. तसेच ज्या ठिकाणी अतिरिक्त खर्च अपेक्षित असेल, त्याची त्वरित प्रशासकीय मान्यता घेऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी टाऊन हॉल साठी लागणाऱ्या वाढीव खर्चाचा सविस्तर तपशील सादर करण्याच्या सूचना दिल्या. तर सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी टाऊन हॉलच्या पुढील कामांची दैनंदिन माहिती प्रशासनाला देत राहण्याची सूचना केली. तसेच टाऊन हॉलचे कामे दर्जेदार आणि अधिक उत्तम करण्याच्या सूचना दिल्या.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.