Published On : Wed, May 17th, 2017

नाल्यांतील गाळ उपसून त्वरित मोकळे करा : उपमहापौर

Advertisement


नागपूर:
नाल्यांतील गाळ उपसून त्याला त्वरित मोकळे करा जेणेकरून नाल्याच्या पाण्याचे प्रवाह मोकळे होतील, असे आदेश उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी प्रशासनाला दिले.

गड्डीगोदाम येथील कत्तलखान्याच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेवक नरेंद्र वालदे, संजय बुर्रेवार, राजेश हाथीबेड होते.

गड्डीगोदाम येथील कत्तलखान्यात गडरलाईन काही दिवसांपासून ओव्हरफ्लो होत आहे. याबाबत तेथील नागरिकांना त्रास होत आहे. या नाल्यांमध्य़े जमा झालेला गाळ, कचरा मोकळा करून त्याला मोकळे करा,त्याचप्रमाणे नागरिकांना भविष्यात अडचण होऊ नये म्हणून त्याची तातडीने व्यवस्था करण्याचे आदेश उपमहापौर पार्डीकर यांनी दिलेत. नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अतिक्रमण त्वरित हटवावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही या तक्रारीकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही उपमहापौरांनी खडेबोल सुनावले. नागरिकांच्या सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.


गड्डीगोदाम व पाचपावली येथील सुतिकागृहाची त्यांनी पाहणी केली. सुतिकागृहात एन्सथेसिएस्टची तातडीने व्यवस्था व्हावी, त्याचप्रमाणे सुतिकागृहात पुरेशी डॉक्टर्सची संख्या वाढवावी, अशी मागणी तेथील डॉक्टरांनी केली. या सर्व मागण्य़ा लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले. त्याचप्रमाणे सुतिकागृहातील मोकळ्या जागेत उद्यान बनावे यासाठी प्रस्ताव स्थायी समिती पुढे मांडण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.


या पाहणी दौऱ्याप्रसंगी डॉ. गजेंद्र महल्ले, झोनल अधिकारी रोहीदास राठोड, विभागीय अधिकारी धर्मेंद्र पाटील, स्वच्छता निरीक्षक भूषण गजभिये आदी उपस्थित होते.