Published On : Sat, Jul 6th, 2019

चरैवेति-चरैवेति या पुस्तकाच्या आसामी भाषेतील आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Advertisement

मुंबई: चरैवेति चरैवेति हे केवळ पुस्तकाचे नाव नाही तर तो राज्यपाल राम नाईक यांच्या शिस्तबद्ध आणि समर्पित जगण्याचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुवाहाटी (आसाम) येथे केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी लिहिलेल्या चरैवेति-चरैवेति या पुस्तकाच्या आसामी भाषेतील आवृत्तीच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. एका सर्वसामान्य माणसाचा राज्यपालपदापर्यंतचा प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनुभवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आसाम आणि मिझोरामचे राज्यपाल डॉ. जगदीश मुखी, मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय, अरूणाचल प्रदेशचे राज्यपाल डॉ. बी. डी. मिश्रा, सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांच्यासह आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. श्री.सोनोवाल यांनी केलेल्या पारंपरिक आणि उत्साही स्वागताने भारावल्याचे सांगून ते म्हणाले, राज्यपाल नाईक यांचे चरैवेति चरैवेति हे पुस्तक ब्रेल लिपीसह अकरा भाषेत यापूर्वीच भाषांतर झाले आहे, ही आनंदाची बाब आहे.

चरैवेति-चरैवेति या मंत्राप्रमाणेच आपले संपूर्ण आयुष्य व्यतित करणाऱ्या श्री.नाईक यांचा जीवनप्रवास एक संघर्षाची गाथा आहे. गॅरेजमध्ये राहणारा सामान्य माणूस आपल्या कार्यकर्तृत्वाने राज्यपालपदापर्यंत पोहोचतो हे त्यांच्या उदाहरणावरून दिसून येते. त्यांनी समाजाच्या वंचित घटकांच्या उन्नतीसाठी कार्य केले. आजही या घटकांशी जोडलेली त्यांची नाळ कायम आहे. विद्यार्थ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.