Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jul 6th, 2019

  लोकसहभागातून गावांचा सर्वांगिण विकास- अमृता फडणवीस

  * फेटरी हे गाव आदर्श ठरले
  * ग्रामस्थांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा
  * जलशुध्दीकरण केंद्राचे लोकार्पण
  * सांस्कृतिक भवनचे लोकार्पण
  * पशु वैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण
  * 14व्या वित्त आयोगातील विविध विकास कामांचे लोकार्पण
  * नविन ग्रामपंचायत भवन परिसरात वृक्षलागवड

  नागपूर: गावाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या सोबत लोकसहभाग महत्वाचा आहे. फेटरी या गावाचा ‘आदर्श गाव’ म्हणून विकास करताना नागरिकांना सर्व योजनांचा लाभ देतांनाच उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्यामुळे आदर्श गावासोबत प्रेक्षणीय गाव ठरले आहे, असे प्रतिपादन श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण आज श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

  यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार समीर मेघे, जिल्हापरिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण, मुख्य वनरक्षक पी. कल्याण कुमार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कोवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  कोणत्याही गावात विकासकामे सुरु असतांना गावकऱ्यांची सकारात्मक दृष्टी आणि इच्छाशक्ती महत्वाची भूमिका बजावतात. फेटरीवासीयांच्या ग्राम विकासातील महत्वपूर्ण योगदानामुळे आज फेटरी गाव हे आदर्श ठरल्याचे श्रीमती अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

  ग्रामस्थांशी संवाद साधतांना श्रीमती फडणवीस म्हणाल्या, फेटरीत आज खूप परिवर्तन झाले आहे. येथे आदर्श सार्वजनिक वाचनालय, आदर्श अंगणवाडी, स्मशानभूमिचा विकास, सार्वजनिक वाचनालय, ग्रामस्थांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामस्थांना या सर्व सुविधांचा लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  ग्रामस्थांच्या ग्राम विकासाच्या इच्छेमुळे आणि पुढाकारामुळे फेटरीचा आदर्श गाव म्हणून नाव लौकिक झाला असून गावाला आज आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे,असेही अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

  यावेळी श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत फेटरी नळपाणी पुरवठा योजनेचे नुतनीकरण तसेच जलशुध्दीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखाना तसेच सांकृतिक भवनाचे लोकार्पण करण्यात आले. खासदार विकास महात्मे यांच्या खासदार निधीतून सांकृतिक भवनासाठी 57 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. 14व्या वित्त आयोगातून नालादुरुस्ती बांधकामाचे आणि मॉयलच्या निधीमधून सिमेंट रस्त्याचे उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात आले. ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 12 लाख रुपयांचा निधी शासनाकडून व 14 लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतच्या इतर फंडातून प्राप्त होवून एकुण 26 लाख रुपयाच्या निधीतून ग्रामपंचायतची नवीन इमारत उभारण्यात आली आहे.

  ग्रामपंचायतकडे उपलब्ध असलेल्या निधीतून 11 लाख 74 हजार रुपयांचे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मागील चार वर्षांत सीएसआर फंड, विविध सामाजिक संस्था आणि खासदार व आमदार यांच्या विशेष निधीतून तसेच शासनाच्या विविध विभागांच्या योजनेतून सुमारे 20 कोटी रुपयांचे विकास कामे फेटरी गावात पूर्ण झाली आहेत.

  वृक्षलागवड मोहीमेअंतर्गत फेटरी येथे नविन ग्रामपंचायत भवन परिसरात श्रीमती फडणवीस यांच्या हस्ते वडाचे रोप लावून वृक्षारोपण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पारंपारिक वेषभूषा धारण करुन भजनी मंडळाच्या महिला व पुरुषांनी ताल मृदंग, ढोल यांच्या साथीने वृक्षारोपण करतांना भजनाची साथ दिली. वनविभागाच्या वतीने या परिसरात विविध प्रजातीच्या एकुण 2,275 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्षलागवडीमध्ये औषधी गुणधर्म असणाऱ्या विविध 32 प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

  फेटरी गाव आज खूप विकसित झाले असून विकासाची गंगा प्रत्येक गावागावात पोहचविण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार डॉ. विकास महात्मे यांनी यावेळी व्यक्त केला.

  यावेळी पंचायत समिती नागपूरच्या सभापती श्रीमती नम्रता राऊत, फेटरीच्या सरपंच श्रीमती धनश्री ढोमणे, पंचायत समिती नागपूरचे उपसभापती सुजीत नितनवरे, जिल्हापरिषद सदस्य सुनिल जामगडे, पंचायत समिती सदस्य प्रभाकर उईके, फेटरीचे उपसरपंच आशिष गणोरकर, सचिव श्रीमती विनया गायकवाड, तसेच फेटरीवासी उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145