Published On : Sat, Jul 6th, 2019

उपमहापौरांसह नवनिर्वाचित आरोग्य समिती सभापतींनी केली भांडेवाडी डम्पींग यार्डची पाहणी

नागपूर : संपूर्ण शहरातून संकलित कच-याचे डम्पींग करण्यात येणा-या भांडेवाडी डम्पींग यार्डची शनिवारी (ता.६) उपमहापौर दीपराज पार्डीकर व नवनिर्वाचित आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी पाहणी केली. या पाहणी दौ-याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपा स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते.

भांडेवाडी डम्पींग यार्डमध्ये जमा होणारा कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. मात्र या कच-यावर प्रक्रिया करून त्यातून नवनिर्मिती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून अनेक प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या पाहणीसह भांडेवाडी डम्पींग यार्डच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (ता.६) उपमहापौर दीपराज पार्डीकर व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी पाहणी दौरा केला.

विशेष म्हणजे आरोग्य समिती सभापतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी हा पाहणी दौरा केला.

भांडेवाडी डम्पींग यार्डमधील कच-याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता यावर प्रतिबंध घालण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांची माहिती यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी जाणून घेतली. भांडेवाडी येथे घन कच-याचे बायो मायनिंग प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाची प्रगती व गती याबाबतही यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर व नवनिर्वाचित आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी आढावा घेतला. प्रकल्पाचे दीपक पाटील यांच्याकडून प्रकल्पाची विस्तृत माहिती घेउन कामात येणा-या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.