Published On : Mon, Apr 22nd, 2019

लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी जनसंपर्क अधिकारी आणि प्रसार माध्यमांनी मत निर्माते बनावे – मुद्गल

नागपूर: देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढावी, लोकशाहीची मुल्ये जोपासल्या जावी याकरिता शासन प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे प्रचाराचा खालावत जाणारा स्तर, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य देत एक राष्ट्र, एक संकल्प, एक स्वर हि भूमिका नक्कीच दिशा देणारी ठरते आणि लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना व आदर निर्माण करण्याचे काम जनसंपर्क अधिकारी आणि प्रसार माध्यमे प्रभावीपणे करू शकतात त्याकरीता त्यांनी “मत निर्माते” (ओपिनियन मेकर) बनून समाजमन तयार करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले. पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर शाखेतर्फे आयोजित राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त ते प्रेस क्लब येथे बोलत होते.

मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, पी.आर.एस.आय.चे अध्यक्ष सत्येंद्र प्रसाद सिंग, महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते तर अध्यक्षस्थान नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी भूषविले.


निवडणुकीचे काम नियोजित वेळेत शांततेत व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून मनुष्यबळ व शासकीय यंत्रणा यामध्ये समनव्यय ठेवावा लागतो. खुर्चीवर बसून निर्णय घेताना कशी कसोटी लागते याचे अचूक वर्णन त्यांनी “मुख्त्सर सी जिंदगी के, अजीब से अफसाने है, यहाँ तीर भी चलाने है, और परिंदे भी बचाने है” या कवितेच्या ओळी सादर करून उपस्थित प्रेक्षांचे लक्ष्य वेधले.

आधुनिक काळात संदेशवहन विद्युत गतीने होत असल्याने जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीही बदलत आहे. त्यामुळे एकीकडे कायद्याची चौकट आणि दुसरीकडे सोशल मिडीया समाजमनावर सातत्याने आघात करीत आहे. अश्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे शक्तिशाली विचार पुढे येऊन फ्रेंच क्रांती झाली तीच ताकद आपल्या संविधानामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. संविधानातील उद्देशिकेत सांगितल्याप्रमाणे राष्ट्राची एकता,अखंडता आणि बंधुता वाढविण्यासाठी प्रत्येकाला दृढसंकल्प स्वीकारून तसे वागावे लागेल व लोकशाहीला अधिक मजबूत करावे लागेल. भारतीय संविधानाची प्रस्तावना हि एक प्रकारचे संकल्प पत्र असून राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त विषयाला समर्पक ठरते असे अभ्यासपूर्ण विवेचन अश्विन मुद्गल यांनी केले. राष्ट्रीय जनसंपर्क दिनासोबतच राष्ट्रीय नागरी सेवा दिनाच्याही शुभेच्छा त्यांनी दिल्या.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे हस्ते बेस्ट पी.आर.ओ. म्हणून अनिल गडेकर यांचा शाल,श्रीफळ,तुळशी रोप व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना अनिल गडेकर म्हणाले कि औरंगाबाद येथून प्रारंभ झालेल्या शासकीय सेवेच्या कारकीर्दीत बदलत्या तंत्रज्ञानासोबतच प्रसार माध्यमांशी शासकीय यंत्रणेशी होणारा संपर्क व समन्वय यात बदल घडत गेले. माहिती अधिकारी म्हणून कर्तव्य बजावतांना प्रसंगावधान राखून घटनेचे महत्व ओळखून सबंधित माहिती प्रसारमाध्यमांना देणे व सर्वांगीण दृष्टीकोन बाळगणे आवश्यक असते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जिल्हा प्रशासनासोबत कार्य करतांना माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचा नोडल अधिकारी या नात्याने यशस्वीरीत्या काम केल्याचे समाधान अनिल गडेकर यांनी व्यक्त केले.

बदलत्या काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. शासन व माध्यमे यामध्ये दुवा म्हणून काम करावे लागते. याप्रसंगी सेवाकाळातील अनुभव,मार्मिक प्रसंग त्यांनी उदाहरणासह सांगितले. जनसंपर्क अधिकारी हा संस्थेचा आरसा असतो व संस्थेप्रती जनमानसात सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे आव्हानात्मक काम तो करीत असतो. देशातील सध्याच्या परिस्थितीचा वेध घेत एक राष्ट्र,एक संकल्प,एक स्वर हा महत्वपूर्ण विषय पब्लिक रिलेशन्स सोसायटीने जनसंपर्क दिनाच्या निमित्ताने पुढे आणला आहे त्याबद्ल प्रदीप मैत्र यांनी पी.आर.एस.आय.चे अभिनंदन केले.

प्रारंभी प्रास्ताविकातून सत्येंद्र प्रसाद सिंग यांनी पब्लिक रिलेशन्स सोसायटीच्या कार्यावर प्रकाश टाकला व राष्ट्रीय हिताकरिता जनसंपर्क अधिकाऱ्यांचा असलेला खारीचा वाटा याबद्दल त्यांनी भूमिका मांडली. कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्र संचालन नागपूर मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी तर आभार प्रदर्शन यशवंत मोहिते यांनी केले. पी.आर.एस.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अजित पाठक यांचा शुभेच्छा संदेशाचे वाचन व अनिल गडेकरांचा परिचय आकाशवाणीच्या सहाय्यक संचालिका गौरी मराठे यांनी केला.

कार्यक्रमाला नागपुरातील कॉर्पोरेट, शासकीय, खाजगी संस्थांमधील जनसंपर्क अधिकारी, निवृत्त अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, पी.आर.एस.आय.चे पदाधिकारी व सदस्य तसेच प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.