Published On : Fri, Mar 26th, 2021

आगामी 5 वर्षात 2 लाख कोटींचे रस्ते बांधणार : ना. नितीन गडकरी

आसाम- धरमपूर येथील जाहीरसभा

नागपूर/धरमपूर, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार फक्त स्वप्न दाखवत नाही तर प्रत्यक्षात विकास करून दाखविणारी सरकार आहे. महामार्ग प्राधिकरणाने आसामात आतापर्यंत 30 हजार कोटींचे रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून 50 हजार कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहे. 35 हजार कोटींची कामे सुरु आहेत. भाजपाचे सरकार सत्तेत आल्यावर आगामी पाच वर्षात 2 लाख कोटींचे रस्ते आसामात बांधण्याची घोषणा केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

धरमपूर येथील भाजपा उमेदवार चंद्रमोहन पटवारी यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित विशाल जाहीरसभेला ते संबोधित करीत होते. याप्रसंगी आसामातील पक्षाचे मान्यवर व ज्येष्ठ नेते सभेला उपस्थित होते. ब्रम्हपुत्रा नदीवर अनेक पूल, जलमार्ग, रिव्हर पोर्ट, बांधून उत्तरपूर्व भारताचा विकास केंद्र शासनाने केला आहे, पहिल्या मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्कचे काम सुरु आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- जलमार्गामुळे तर मालवाहतूक खर्चात बचत करून आसामला उत्तरपूर्व आशियाशी जोडण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. आता आसामचा विकास होईल. तरुणांना रोजगार मिळेल, गरिबी-उपासमारीपासून मुक्ती मिळेल.

https://www.facebook.com/watch/?v=3894220717332702

उत्तर पूर्व भारतात बांबूचा उद्योग प्रमुख आहे, हे लक्षात घेऊन केंद्र शासनाने 1300 कोटींच्या बांबू मिशनला मंजुरी दिल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- बांबूपासून इथेनॉलची निर्मिती करणार्‍या एक प्रकल्प या भागात होत असून त्याचे काम पूर्ण होत आले आहे. आता डिझेल पेट्रोलसोबत इथेनॉलचा पंपही आपण सुरु करू शकतो. केंद्र सरकार आसामचा विकास करू पाहात आहे. बांबूपासून अगरबत्तीच्या काड्यांचा 4 हजार कोटींचा येथे उद्योग विकसित केला जात आहे.

https://www.facebook.com/watch/?v=278394383655248
आसाम हा अगरबत्तीच्या काड्या बनविण्याचा हब निर्माण होत आहे. बांबूमुळेच आसामचा विकास होणार असून तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. जात-पात, भाषा पंथ नष्ट करून सामाजिक समानता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारत हा जगातील पहिल्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनेल तेव्हा आसामही प्रगतीशील होईल आणि यासाठी भाजपाच्या उमेदवाराला विजयी करून पुन्हा भाजपाच्या हाती सत्ता द्या, असे आवाहनही ना. गडकरी यांनी केले. लाखोंचा जनसमुदाय या जाहीरसभेसाठी भर उन्हात उपस्थित होता.