Published On : Fri, Mar 26th, 2021

नवीन पिढीला रस्ता सुरक्षेबाबत प्रशिक्षण आवश्यक : ना.गडकरी

Advertisement

पद्मश्री शंकर महादेवन यांच्या आवाजातील रस्ता सुरक्षा गीत


नागपूर: सर्वाधिक रस्तेअपघात आमच्या देशात होतात. दरवर्षी 5 लाख अपघात होतात आणि 1.5 लाखावर लोक त्यात मृत्युमुखी पडतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. शून्य अपघाताचा आमचा प्रयत्न आहे. हे लक्षात घेता नवीन पिढीला रस्ता सुरक्षेबाबत प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

पद्मश्री शंकर महादेव यांच्या आवाजातील रस्ता सुरक्षा गीताचा शुभारंभ प्रसंगी ना. गडकरी बोलत होते. ते पुढे म्हणाले- अपघातातील अधिकाधिक मृत्यू हे 18 ते 40 या वयोगटातील लोकांचे होत आहेत. अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आम्ही रोड इंजिनिअरिंगमध्ये सुधारणा करीत आहोत. रस्ता सुरक्षा कायद्याची कडक अमलबजावणी आणि अपघात स्थळांचे निर्मूलन, यासोबतच रस्त्याच्या सुरक्षेबाबत जनजागृती आणि प्रशिक्षण अशा उपाययोजना करण्यात येत आहे.

अपघातांवर आणि मृत्यूंवर नियंत्रण मिळविण्यासाठी तामिळनाडू राज्य शासनाने चांगली उपाययोजना केली आहे. या राज्याने 50 टक्के अपघातांवर नियंत्रण आणले आहे. समाजातील सर्वांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केले तर अपघातांवर नियंत्रण मिळविणे आणि अपघाती मृत्यू रोखणे शक्य आहे, असेही ते म्हणाले.

रस्ता सुरक्षेचे हे गीत जनजागृती निर्माण करण्यासाठी लहान मुलांपर्यंत पोहाचावे अशी अपेक्षा व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- लहान मुलांपर्यंत हे गाणे पोहोचले की त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होईल व रस्ता सुरक्षेचे नियम पाळणे किती आवश्यक आहे, हे त्यांनाही कळेल व ते एक चांगला नागरिक बनतील. पद्मश्री शंकर महादेवन हे सिध्दहस्त गायक आहेत.

या गीतासाठी पुढाकार घेणे म्हणजे सामाजिक संवदेनशीलता आणि सामाजिक जबाबदारी जाणीव असल्याचे सिध्द होते. शाळा-शाळांमध्ये हे गीत पोचावे. त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.