Published On : Sat, Jun 2nd, 2018

बुलेट ट्रेन प्रकल्पाची जनसुनावणी मनसैनिक आणि स्थानिकांनी लावली उधळून

Advertisement
Bullet Train

File Pic

पालघर: जिल्ह्यात बुलेट ट्रेन संदर्भात आयोजित केलेली जनसुनावणी आज मनसैनिक आणि स्थानिकांनी उधळून लावली. या जनसुनावणीच्यावेळी प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजी सुरु होती. त्यामुळे प्रशासनाला जनसुनावणी रद्द करावी लागली. ही जनसुनावणी महिन्याभरात दुसऱ्यांदा घेण्यात आली असून, रद्द करण्यात आली आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्यातील जवळपास ३९.६६ किमीचा मार्ग वापरण्यात येणार आहे. दिव्याजवळील अडवली, भुतावली, शिळ, डावले, पडले, देसाई, आगासन, बेतवडा, म्हातार्डी या गावांतून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पालघर जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी द्यायला येथील शेतकरी विरोध करत आहे. यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी जनसुनावणी होणे आवश्यक आहे. मोदींच्या या महत्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थानिकांसह मनसेचा विरोध आहे. एकूण २१ संघटना या प्रकल्पाच्या विरोधात आहेत.

महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्यातील शेतकरी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन द्यायला विरोध करत आहेत. काही शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात येणारे नुकसानभरपाईची रक्कम मान्य नाही, तर काही शेतकऱ्यांचा जमीन द्यायलाच विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प अडचणीत सापडला आहे. आणखी विलंब लागला तर हा प्रकल्प ठरलेल्या मुदतीत २०२३ पर्यंत कार्यान्वित होऊ शकणार नाही असे जपान सरकारच्या अधिकाऱ्याने म्हटले होते.

ग्रामस्थांना जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत कोणतेही काम होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत ८ मे रोजी दिवा परिसरातील अडवली, म्हातार्डी, शिळ येथील नागरिकांनी बुलेट ट्रेनसाठीच्या सर्वेक्षणाचे काम बंद पाडले होते. त्यातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला.