Published On : Sat, Jun 2nd, 2018

सदर रोगनिदान केंद्र, इंदिरा गांधी रुग्णालयाला आरोग्य सभापतींची आकस्मिक भेट

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित सदर रोग निदान केंद्र आणि इंदिरा गांधी रुग्णालयाला आरोग्य सभापती मनोज चापले यांनी शनिवारी (ता. २) सकाळी आकस्मिक भेट देऊ पाहणी केली व अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेत येण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

आरोग्य सभापती मनोज चापले यांच्यासोबत यावेळी अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, वैद्यकिय अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते. प्रारंभी सभापती चापले यांनी सदर रोगनिदा केंद्राला भेट दिली. रुग्णालयात उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. रुग्णांशीही त्यांनी संवाद साधला. पंचकर्म आयुर्वेदिक दवाखाना, एक्स-रे विभाग, दंतचिकित्सा यूनिटची त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते यांना त्यांनी दिले.

सदर रुग्णालयातील इमारतीच्या ओपीडी व अन्य काही ठिकाणी पाणी झिरपते. त्यामुळे पावसळ्यापूर्वी इमारतीची डागडुजी करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

अनुपस्थित कर्मचाऱ्यांना द्या ‘कारणे दाखवा’ नोटीस
सदर रोगनिदान केंद्राच्या पाहणीनंतर त्यांनी गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांना काही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. कुठलीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मनपाच्या प्रत्येक दवाखान्यात बायो-मेडिकल वेस्टसाठी डस्टबीन यथाशीघ्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळेत कर्तव्यावर हजर राहण्याचे निर्देश दिले. यानंतर कधीही रुग्णालयाचे आकस्मिक निरीक्षण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.