Published On : Wed, Aug 28th, 2019

अटल महापणन विकास अभियानअंतर्गत लोकसंवाद मोहिम

Advertisement

नागपूर : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत लोकसंवाद मोहिम राबविण्यात येत असून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे याअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपनिबंधक अजय कडू, सहाय्यक निबंधक अ.रा. गिरी, उपनिबंधक राजेंद्र कौसडीकर, उपनिबंधक सीमा पांडे, सहाय्यक निबंधक संजया आगरकर, किशोर बलिंगे, चैतन्य नाथरे, विभागीय व्यवस्थापक दिपक बेदरकर, अविनाश गुल्हाने, चरणजित सिंग अरोरा, संतोष खत्री, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्री. नाईक हे उपस्थित होते.

यावेळी अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांची माहिती, जनजागृतीसाठी लोकसंवाद मोहिमेबाबतची माहिती, खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधी यांच्या यशकथांचे सादरीकरण याबाबतची माहिती देण्यात आली.

सहकारी पणन व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी अटल महापणन विकास अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानात खरेदी विक्री संघ व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी नाविन्यपूर्ण उपक्रम व व्यवसाय सुरु केले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचतगटही यामध्ये अग्रेसर आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायटी, सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक संस्था व महिला स्वयंसहाय्यता गट बळकट करणे, पणनच्या त्रिस्तरीय रचनेच्या बळकटीकरणातून राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पणनविषयक सुविधा देवून संस्थांची आर्थिक उलाढाल वाढविणे, यामध्ये शासकीय संस्थांसह कॉर्पोरेट संस्था व शेतकरी सभासद यांचा लोकसहभाग अधिकाधिक वाढविणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असून यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, उपनिबंधक, सहाय्यक निबंधक या कार्यालयांशी संपर्क साधावा, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.