Published On : Wed, Aug 28th, 2019

महावितरण जनमित्रास धमकी देणारा अटकेत

नागपूर: थकीत वीज देयकाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरण जनमित्रास शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वीज ग्राहकास हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हुडकेश्वर शाखा कार्यालयात कार्यरत असणारे वरिष्ट तंत्रज्ञ मधुकर डाखोळे यांनी वीज देयकाची थकबाकी असलेल्या मुरलीधर गैताफाने या वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला. यानंतर वीज ग्राहकाने थकीत रकमेचा भरणा केला.

थकीत रकमेचा भरणा केल्यावर वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वरिष्ट तंत्रज्ञ मधुकर डाखोळे, मुरलीधर गैताफाने यांच्या घरी गेले. वीज पुरवठा खंडित केल्याने चिडलेल्या मुरलीधर गैताफाने याने वरिष्ट तंत्रज्ञ मधुकर डाखोळे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती महावितरणच्या हुडकेश्वर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय मते यांना समजताच त्यांनी हुडकेश्वर पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. या प्रकरणी आरोपी मुरलीधर गैताफाने याच्या विरुद्ध भादंवि कलम १८६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.