Published On : Wed, Oct 14th, 2020

जनतेचे सहकार्य, प्रभावी व परिणामकारक उपचारामुळे कोरोनावर नियंत्रण सुलभ – रविंद्र ठाकरे

ग्रामीण भागात पोस्ट कोविड ओपीडी सुविधा

·माझे क्षेत्र, माझा पुढाकारात लोकप्रतिनिधींचा सहभाग

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रभाव तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रशासनाने जनतेच्या सहभागातून प्रभावी व परिणामकारक उपाययोजना राबविल्या आहेत. जिल्हयात रुग्ण संख्या नियंत्रणात येत असली तरी भविष्यातील परिस्थिती अनुरुप आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जनतेने स्वयंस्फुर्तीने नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव आणि प्रशासनातर्फे सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आज दिली. कोरोना उपचारासंदर्भात जिल्हा प्रशासनाने माध्यम प्रतिनिधींनी सुचविलेल्या विविध सूचनांचे स्वागत करुन त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.

वसंतराव नाईक कृषी प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात कोरोनावरील उपचार व माध्यम प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख मोईज हक उपस्थित होते.

कोरोना विषाणुसंदर्भात जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा तसेच संबंधित विविध विभाग सातत्याने कार्यरत आहेत. कोरोनासंदर्भात तपासण्यांपासून विलगीकरणापर्यंत प्रभावी व परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगतांना रविंद्र ठाकरे म्हणाले की, या विषाणुसंदर्भात जनतेमध्ये असलेला गैरसमज दूर करुन त्यांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी प्रशासन काम करीत आहेत. उपचारासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर शासकीय संस्थांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. या दुष्टीने आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

कोरोना उपचारासंदर्भात चाचण्यांची संख्या वाढविणे, पॉझिटीव्ह रुग्णांच्या जवळचे नातेवाईक (हाय रिक्स कॉनटॅक्ट) तपासणी, विलगीकरणात असलेल्या रुग्णांना उपचार उपलब्ध करुन देणे, तसेच निरंतर सर्वे त्यासोबत ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ याअंतर्गत प्रत्येक नागरिकांची तपासणी करणे याला प्राधान्य देण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हयातील लोकप्रतिनिधींचा सहभाग घेण्यात येत असून यासाठी सरपंच, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्या पुढाकारात ‘माझे क्षेत्र – माझा पुढाकार’ ही अभिनव संकल्पना सुरु करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीसह सर्व लोकप्रतिनिधींना यामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही अथवा हॉस्पीटलमध्ये बेड उपलब्ध होत नाही याबाबतही मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण केल्या जात आहे. प्रशासनाने अशा रुग्णांना भरती करण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना यामुळे सहज बेड उपलब्ध होत आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना फोनवर सुध्दा उपचारासंदर्भात माहिती देण्यात येत आहेत. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना मानसोपचार तज्ज्ञांमार्फत आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात अतिरिक्त शुल्क आकारण्यासंदर्भातील तक्रारींची तात्काळ तपासणी केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अविनाश गावंडे, वृत्तपत्र विद्य विभाग प्रमुख मोईज हक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासंदर्भात रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी सोडवून अधिक सूलभ उपचार पध्दतीसंदर्भात केलेल्या सुविधांची माहिती दिली.