Published On : Fri, Dec 27th, 2019

मनपाच्या शाळांत ‘सॅनिटरी पॅड’ पुरविणार

Advertisement

– ‘डिस्पोज युनीट’चीही करणार व्यवस्था : ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’च्या प्रस्तावावर मनपा करणार अंमलबजावणी

नागपूर : नागपूर महानगरपालिकांमधील २८ शाळांतील सुमारे साडे तीन हजारांवर असलेल्या विद्यार्थिनींना मनपातर्फे सॅनिटरी पॅड पुरविण्यात येणार आहे. वापरानंतर त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावता यावी यासाठी प्रत्येक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोज युनीट लावणार असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

Gold Rate
05 May 2025
Gold 24 KT 93,900/-
Gold 22 KT 87,300/-
Silver/Kg 95,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकाद्वारे संचालित साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळेत ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ‘नई दिशा’ अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (ता. २७) करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे, मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चापलेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा वाशीमकर, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या नसरीन अंसारी, मंगला घोडेस्वार, अर्चना जोशी यांची उपस्थिती होती.

आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेने ‘नई दिशा’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या २८ शाळांमधील किशोरवयीन मुलींच्या समस्या, त्यासाठी जनजागृती, आवश्यक बाबी यासंदर्भात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था शाळेत आहे अथवा नाही, व्यवस्था असली तरी मुली त्याचा उपयोग करतात अथवा नाही, बाथरुममधील अस्वच्छता, शाळांमध्ये सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था आहे अथवा नाही, विद्यार्थिनींच्या अपेक्षा काय, आदी प्रश्नांबाबत माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे संस्थेने नागपूर महानगरपालिकेकडे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी शाळांमध्ये काय सोयी-सुविधा असायला हव्या,याबाबत एक प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावानुसार, शाळेत सॅनिटरी पॅडचा नियमित पुरवठा करण्यात यावा, सॅनिटरी पॅड विल्हेवाटीसाठी ‘डिस्पोज युनीट’ असायला हवे, स्वच्छतागृहांमध्ये पाणी व स्वच्छतेची सोय व मुलींसाठी पुरेशी सुरक्षित व्यवस्था असावी, मासिक पाळी विषयक आरोग्य संबंधाने सल्ला व समुपदेशन व्यवस्था असावी, शिक्षण विभागाने मासिक पाळी स्वच्छतेकरिता शाळा स्तरावर सुविधा उपलब्ध करण्याकरिता अर्थसंकल्पात तरतूद करावी असे सुचविले होते.

यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थिनी यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या दृष्टीने साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेने दिलेल्या प्रस्तावाचे स्वागत करीत सॅनिटरी पॅडसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही दिली. लवकरच प्रत्येक शाळांमध्ये ‘डिस्पोज युनीट’ लावण्यात येईल, असे सांगितले. शाळांमधील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत आपण स्वत: लक्ष घालणार असून यापुढे स्वच्छतेत कुठलीही हयगय होणार नाही, असे आश्वासन दिले. वेळोवेळी किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असेही सांगितले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि विद्यार्थिनींनीही अधिकाऱ्यांशी संवाद साधला. विद्यार्थिनींच्या समस्या मांडत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिलेल्या आश्वासनांचे स्वागतही केले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे यांनी यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधला.

आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेने किशोरवयीन विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. डिस्पोज युनीटची व्यवस्था समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून करता येईल का, यावर विचार करण्यात येईल आणि त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या नसरीन अंसारी यांनी ‘नई दिशा’ अभियानाबाबत माहिती दिली. संस्थेतर्फे नागपूर महानगरपालिका शाळांसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची आणि सूचनांची माहिती दिली. कार्यक्रमाला मनपाच्या २८ शाळांतील शिक्षक-शिक्षिका, पालक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

काय आहे ‘नई दिशा’ अभियान?
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात कार्यरत असलेल्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आरोग्याबाबत विविध प्रकल्प राबविले जातात. ‘नई दिशा’ हा प्रकल्प किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कसे असावे यासाठी जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी राबविला जात आहे. नागपूर महानगरपालिकेसोबत ऑगस्ट २०१९ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली असून महापालिकेद्वारा संचालित २८ शाळांमध्ये प्रकल्प राबविण्यात आला आहे. याअंतर्गत सॅनिटरी पॅड, डिस्पोज युनीट व स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यात आली.

Advertisement
Advertisement