Published On : Tue, Oct 1st, 2019

स्वच्छता कर्मचा-यांना आवश्यक साहित्य प्रदान

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत स्वच्छता कर्मचा-यांना मनपातर्फे विविध आवश्यक साहित्य प्रदान करण्यात आले. नेहरू नगर झोनमधील शीतलामाता मंदिर येथे सोमवारी (ता.३०) स्वच्छता कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, सहायक आयुक्त स्नेहा कलपे, सामाजिक कार्यकर्त्या लीना बुधे आदी उपस्थित होते.

यावेळी स्वच्छता कर्मचा-यांना ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. मात्र हे वर्गीकरण करताना आवश्यक सुरक्षा जपण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कचरा वर्गीकरण करताना हातात रबरी मोजे, तोंडाला मास्के, अंगात जॉकेट असणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य जपताना स्वच्छता कर्मचा-यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होउ नये यासाठी मनपातर्फे सर्व कर्मचा-यांना फ्लोरोसन जॅकेट, गमबुट, नोज मास्क, हॅण्ड ग्लोज आदी सुरक्षा साहित्य प्रदान करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी स्वच्छता कर्मचा-यांनी दिलेले साहित्य नियमीत वापरूनच दैनंदिन स्वच्छता कार्य करण्याचे आवाहन कर्मचा-यांना केले. आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांनी ‘सिंगल युज प्लास्टिक’चे वापर न करण्याबाबत मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशानुसार २ ऑक्टोबरला ‘सिंगल युज प्लास्टिक’ निर्बंधाबाबत राबविण्यात येणा-या मोहिमेबाबत यावेळी स्वच्छता कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.