नागपूर : नागपूर विभागातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू स्वस्तात व विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसिलदारांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्यासह जिल्हाधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.
शासन निर्णय दिनांक 30 एप्रिल 2025 नुसार, ग्रामपंचायत हद्दीतील वाळूगटांपैकी लिलावात न गेलेल्या, आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मान्यता प्राप्त वाळूगटांतून अधिकतम 5 ब्रास वाळू पात्र लाभार्थ्यांना स्वामित्वधन न आकारता उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले.
या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, यासाठी सर्व तहसिलदारांनी स्थानिक आमदारांबरोबर तर जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांबरोबर पुढील 15 दिवसांत बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तहसिलदारांनी संबंधित लाभार्थ्यांना जवळच्या वाळूगटातून ऑनलाईन पास अर्जाविनाच प्रदान करावा. लाभार्थ्यांनी हा पास तहसिलदार कार्यालयातून डाऊनलोड करून ग्राम महसूल अधिकारी किंवा ग्राम विकास अधिकाऱ्यांमार्फत वाळू घरपोच मिळवावी, अशाही सूचना देण्यात आल्या.
वाळूसाठी प्रतिब्रास 600 रुपये या स्वामित्वधनाच्या दरापेक्षा कमी नसलेले शुल्क आकारून वाळूचा पुरवठा करण्यात यावा. नागपूर विभागात ही प्रक्रिया तत्काळ व प्रभावीपणे राबवावी, असे आदेश श्री. बावनकुळे यांनी बैठकीदरम्यान स्पष्ट केले.










