नागपूर – शहरातील एका शाळेतील पालकांना व्हॉट्सअॅपवरून आलेल्या एका संदेशनं नागपूरमध्ये मोठी खळबळ उडवली आहे. सहावी ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना शैक्षणिक कारणासाठी फोटो पाठवण्यास सांगितले गेले. मात्र, पुढे जाऊन काही पालकांना त्यांच्या मुलींचे अर्धनग्न फोटो मागवण्यात आल्याने प्रकरण गंभीर वळणावर गेले आहे.
संदेशात स्वतःला शाळेतील शिक्षिका असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने सुरुवातीला पासपोर्ट साइज फोटो मागितले. काही पालकांनी खातरजमा न करता फोटो पाठवले. नंतर मात्र ‘सरकारी योजनेसाठी’ म्हणून अर्धनग्न फोटो मागवण्यात आल्याचे स्पष्ट होताच पालकांनी तत्काळ शाळेशी संपर्क साधला. चौकशीतून हे सर्व संदेश फसवणुकीचे असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी सुमारे 15 ते 16 विद्यार्थिनींच्या पालकांना अशा प्रकारचे संदेश आले असून, कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून, नागपूर शहरात या घटनेमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.