Published On : Fri, Nov 15th, 2019

ड्रोन मोजणीमुळे होणार ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संरक्षण -एस. चोक्कलिंगम

नागपूर जिल्ह्यातील गावठाणातील मिळकतींचा ड्रोनव्दारे

सर्व्हे करण्याबाबत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

नागपूर : ड्रोन मोजणीचा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीला फायदा होणार असून कर आकारणी आपोआप अद्यायावत होणार आहे. ड्रोन मोजणीमुळे गावातील गावकऱ्यांचे मालकी हक्क व हद्दीबाबतचे वाद संपुष्टात येऊन ग्रामस्थांच्या नागरी हक्काचे संरक्षण होणार असल्याचे प्रतिपादन जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात आज नागपूर जिल्हयातील ड्रोनद्वारे गावठाण भूमापन प्रकल्पाबाबत एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम यांचे हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते.

ग्राम विकास विभाग, भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग ,केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्हयातील ड्रोनद्वारे गावठाण भूमापन प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाबाबत आयोजित कार्यशाळेत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपसंचालक भूमि अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त बाळासाहेब काळे, भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक जी. बी. डाबेवार उपस्थित होते.

ड्रोनद्वारे गावठाण भूमापन प्रकल्पाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भूमी अभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम यांनी पारंपारिक मोजणी पद्धतीपेक्षा ड्रोनद्वारे कमी वेळेत कमी श्रमात व कमी मनुष्यबळाचा वापर करून मोजणी करता येते. गावठाणाच्या हद्दीतील प्रत्येक मिळकतीचा नकाशा तयार होईल व प्रत्येक मिळकतीची सीमा निश्चित होवून मिळकतीचे नेमके क्षेत्र माहीत होईल. शिवाय ग्रामपंचायतीच्या महसूलात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ड्रोनद्वारे गावठाण भूमापन केल्यास कर आकारणी आपोआप अद्ययावत होणार आहे. ग्रामपंचायतकडील मालमत्ता कर निर्धारण पत्रक आपोआप तयार होईल. त्याचप्रमाणे गावठाणातील प्रत्येक मिळकतीची मिळकत पत्रिका तयार होईल. गावातील रस्ते, शासन, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या जागा निश्चित होवून अतिक्रमणाचा विळखा रोखता येईल. गावकऱ्यांची मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे त्यांना घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येवून गावाची आर्थिक स्थिती सुधारेल,असेही संचालक एस. चोक्कलिंगम यावेळी म्हणाले.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी ड्रोन मोजणीचा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीला होणारा फायदा व त्याबाबतची माहिती ग्रामसभेत देण्याबाबत ग्रामसेवकांना निर्देश दिलेत. ड्रोन मोजणीमुळे विविध विकास यंत्रणा व विभागांना नियोजन करतांना सुलभ होईल. शिवाय कामात पारदर्शकता व अचूकता निर्माण होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

ड्रोन सर्व्हे केल्याने गावठाणातील मालमत्तांचे जीआयएस आधारीत रेखांकन व मुल्यांकन होणार असल्याने गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. ड्रोनद्वारे मोजणीबाबत गावकऱ्यांना विश्वासात घेवून त्यांना हा प्रकल्प समजावून सांगा. पूर्ण गावात ड्रोन फिरेल, त्यावेळी सुरक्षितेकडेही लक्ष देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्यात.

कार्यशाळेचे संचालन उपअधीक्षक श्रीमती सपना पाटील तर आभार जिल्हा अधीक्षक जी. बी. डाबेवार यांनी केले. यावेळी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. याप्रमाणेच सावनेर, काटोल व कळमेश्वर तालुक्याकरिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली.