बुलढाणा : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. “या प्रकल्पात तब्बल १५,००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा गौप्यस्फोट करत त्यांनी सरकारकडे श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी केली आहे.
सपकाळ म्हणाले, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून केवळ वाहतूक नव्हे, तर भ्रष्टाचाराचा प्रवास सुरू झाला आहे. हा प्रकल्प मूळतः ५५,००० कोटींचा होता, परंतु तो वाढून तब्बल ७०,००० कोटी रुपयांपर्यंत गेला. भायंदर टनेलमधील ३,००० कोटींचा भ्रष्टाचार सुप्रीम कोर्टानेच सिद्ध केला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गातही १५,००० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे वास्तव नाकारता येणार नाही.
त्यांनी असा आरोप केला की, ५० बक्स्यांतील पैसा वापरून शिवसेना फोडण्याचा कार्यक्रम राबवला गेला, आणि त्या साठी समृद्धी महामार्गाचा निधी वापरण्यात आला. हा महामार्ग नव्हे, तर एक घोटाळ्याचा मार्ग आहे.
श्वेतपत्रिका सादर करा, अशी मागणी सपकाल यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, “समृद्धी महामार्गासाठी किती निधी कुठे खर्च झाला? प्रत्येक पुलासाठी, प्रत्येक किलोमीटरसाठी किती खर्च झाला? कोणत्या ठेकेदाराला किती पैसे देण्यात आले? वृक्षारोपणासाठी किती निधी वापरला? आणि आता टोलच्या नावाखाली नागरिकांकडून किती पैसा वसूल केला जातोय? या सगळ्याची माहिती सरकारने श्वेतपत्रिकेद्वारे जनतेसमोर आणली पाहिजे.
ते पुढे म्हणाले, जर या प्रकल्पात एकही भ्रष्टाचार झाला नसेल, तर सरकारने घाबरायचं काही कारण नाही. नैतिकता असेल, तर लगेच श्वेतपत्रिका जाहीर करा. अन्यथा लोक समजतील की यात काहीतरी काळं आहे.सपकाळ यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, भाजप व शिंदे गट यांच्याकडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिलं जातं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.