Published On : Thu, Oct 4th, 2018

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सोयी पुरविण्यासाठी कटिबद्ध : प्रा. दिलीप दिवे

नागपूर: महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. त्यांना चांगल्यात चांगल्या सोयी देऊन त्यांच्यातील बुद्धिमत्तेला वाव देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे सुरू आहे. चांगल्या सेवा देण्यासाठी मनपा कटिबद्ध असून त्यांच्या निरंतर शैक्षणिक विकासासाठी सतत प्रयत्नरत राहू, असे प्रतिपादन मनपा शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वेटर वितरण करण्याचा शुभारंभ बुधवारी (ता. ३) करण्यात आले. विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मनपातील सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, शिक्षण समितीच्या उपसभापती भारती बुंदे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, शिक्षण समितीचे सदस्य नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, नगरसेविका प्रमिला मंथरानी, नगरसेविका स्वाती आखतकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर, शिक्षक-पालक समितीचे गजानन निशितकर, शाळा निरीक्षक संजय दिघोरे यावेळी उपस्थित होते.

शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे पुढे बोलताना म्हणाले, स्वेटर असो, गणवेश असो, पुस्तके असो, या सर्व सोयी वेळेच्या आत विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी शिक्षण समितीसह शिक्षण विभागाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असते. यंदा हिवाळा सुरू होण्याच्या अगोदरच विद्यार्थ्यांच्या हातात स्वेटर पडावे, ही शिक्षण समितीची इच्छा होती. त्यानुसार स्वेटर प्राप्त झाले असून आठवडाभरात सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना स्वेटर मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनपाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांना स्वेटर उपलब्ध करून देऊ शकलो, याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. मनपाच्या शाळांकडे विद्यार्थी वळायला हवा यासाठी बदलत्या काळानुसार या शाळांमध्ये बदल करणे सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या शाळांच्या बदलत्या स्वरूपाचे कौतुक केले. वंचित घटकांना या शाळांमधून उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण समिती आणि मनपाचा शिक्षण विभाग कठोर मेहनत घेत आहे. मनपाच्या शाळांचे निकाल उत्तम लागत आहेत. शिक्षण क्षेत्रात या शाळांतील विद्यार्थी भरारी घेत आहेत. हा प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहील आणि मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच समाधानाचे स्मित असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिक्षण समितीच्या उपसभापती भारती बुंदे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मनपा संपूर्ण विद्यार्थ्यांची पालक आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले. संचालन मुख्याध्यापिका (माध्यमिक) संध्या इंगळे यांनी केले. आभार मुख्याध्यापिका (उच्च प्राथमिक) रजनी वाघाडे यांनी मानले.


विद्यार्थ्यांना स्वेटर वितरण
यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्वेटरचे वितरण करण्यात आले. हा शुभारंभाचा कार्यक्रम होता. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना पुढील काही दिवसांत स्वेटर मिळतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रास्ताविकातून दिली.

संदीप जोशी यांचा सत्कार
महाराष्ट्र शासनाने लघु उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची नियुक्ती केल्याबद्दल मनपा शिक्षण समिती आणि शिक्षण विभागाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या प्रेमाचा मी स्वीकार करतो, या शब्दात सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सत्काराला भावुक उत्तर दिले.