Published On : Sun, Jul 1st, 2018

स्वयंप्रेरणा आणि सकारात्मकतेद्वारे शाश्वत समाजपरिवर्तन शक्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर : स्वयंप्रेरणा आणि सकारात्मकता समाजात सातत्याने पोहोचविल्यास शाश्वत समाजपरिवर्तन सहज शक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रेशिमबाग येथील सभागृहात आज अनुगामी लोकराज्य महाअभियान-तृतीय अनुलोम संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अतुल वझे व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वयंप्रेरणेने काम करत समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या संस्थांचे कार्य मोलाचे आहे. समाजाला आज मोठ्याप्रमाणात स्वयंप्रेरणेची गरज आहे. समाज आत्मकेंद्रित होता कामा नये. सर्व समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा दृष्टीकोन सातत्याने बाळगला पाहिजे. समाज व व्यवस्थेमध्ये मैत्रीपूर्ण संबंध हवे. यातूनच विश्वासार्हता वाढीस लागते. सृजन आणि परिवर्तन घडविण्याचा आनंद वेगळेच समाधान देणारा असतो. समाज जोडण्याच्या कामातूनच समाज परिवर्तनाचे काम होत असते. विकासाची मोठी झेप घेण्याची संधी भारताला प्राप्त झाली आहे. सर्वात मोठी लोकशाही व अर्थव्यस्था यामुळे भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

प्रदुषणरहित विकास यासंदर्भात श्री.फडणवीस म्हणाले, नदीपुरुज्जीवन, पाणलोट विकास, 13 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प यासारख्या पर्यावरणपूरक विविध संकल्पनांवर वाटचाल करण्यात येत असून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात जलसंधारणाची विविध कामे मोठ्या प्रमाणावर झाली. व यातून आमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येत आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेद्वारेही शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे बदल होत आहेत. राज्यामध्ये घरटी शौचालयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून योजना समाजाच्या झाल्या की त्या शाश्वत होतात, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या उपक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुणांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.