नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरस्थित संयुक्त प्रादेशिक केंद्र-सी.आर.सी. (दिव्यांगजन) तसेच युवा करिअर व बोधीवृक्ष शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तीकरिता सहाय्यकारी साहित्य व उपकरण वितरणाचा कार्यक्रम 16 एप्रिल 2018 सोमवार रोजी स्थानिक डॉ. आंबेडकरनगर मधील धरमपेठ बुद्ध विहारात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी राज्याच्या विशेष कृती विभागाचे (स्पेशल ऑपरेशन्स युनीट) अतिरिक्त पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम अध्यक्षस्थानी तर सी.आर. सी. नागपुरचे संचालक गुरबक्श चंद जगोटा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी , जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, युवा करिअरचे संपादक मोनाल थुल प्रामुख्याने उपस्थित होते.
अनुसूचित जाती प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींमध्ये पुनर्वसनासंदर्भात जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने लाभार्थ्यांना व्हील चेयर, सी.पी. (सेरेब्रल प्लासी) चेयर, सिटिंग चेयर डिजिटल कर्ण यंत्र तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी किटस् अशा विविध आवश्यक साहित्य व उपकरणांचे वितरण याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर उपकरणे ही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अधीन असणा-या आर्टिफिशयल लिंब मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (अल्मिको) या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या सहकार्याने तयार केलेली आहेत.
अपंग पुनर्वसन क्षेत्रात सर्व समाज घटकांचे सहकार्य अपेक्षित असून या क्षेत्रात संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याच्या विशेष कृती विभागाचे अपर पोलीस महासंचालक डी.कनकरत्नम यांनी यावेळी केले. अपंगत्वाला टाळण्यासाठी शिशु अवस्थेपासून वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक असून सुदृढ बाळासाठीच्या शासकीय योजनांचा लाभ सर्व समाजघटकांनी घ्यावा. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून पाठबळ उपलब्ध झाले आहे, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी यांनी मांडले. दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात होणा-या कार्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे जनमाणसात पोहचून त्यांच्यामध्ये संवेदशीलता निर्माण होण्यास मदत होते, असे संयुक्त प्रादेशिक केंद्राचे संचालक गुरुबक्श जगोटा यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. नंदकिशोर भगत यानी केले तर आभार प्रदर्शन मोनाल थुल यांनी केले. साहित्य व उपकरण वितरण कार्यक्रमाप्रसंगी सी.आर.सी चे कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.