Published On : Thu, Jul 2nd, 2020

संकटकाळात पृथ्वीतलावर अवतरले कोरोना योद्धा

– भदंत ससाई यांनी व्यक्त केली कृतज्ञता
– नालंदा वसतिगृहात परित्राण पाठ


नागपूर: आयुष्यात संकटे येतातच. संकट असले की, सोबत संघर्षाची प्रेरणा मिळते आणि जगण्याची ऊर्जा सुद्धा. कारण बळ हे संकटाचे राखणदार असते. कोरोनाच्या रूपात आलेल्या संकटासोबत लोकांना बळही मिळाले. त्यांना चांगले कामे करण्याची प्रेरणा आणि संधी मिळाली. त्यांनी गरीब, गरजू, निराधार, मजुरांची दोन्ही हात मोकळे करून सेवा केली, ते खèया अर्थाने या पृथ्वीतलावरील कोरोना योद्धा आहेत, अशा शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी संकटकाळातील देवदूतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

कोरोना युद्धात लढा देणाèया योद्ध्यांचा इंदोरा बुद्ध विहार कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. इंदोरा येथील नालंदा वसतिगृहात त्या सर्व मदत करणाèयांचा सत्कार करून भविष्यात अशा संकटांचा सामना करण्यासाठी संपूर्ण समाज प्रयत्नशील असेल, अशी अपेक्षाही ससाई यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी ससाई यांनी परीत्राण पाठ घेतला.

कोरोनाच्या पृष्ठभूमीवर भदंत ससाई यांच्या आवाहनावर शहरातीलच नव्हे तर राज्य आणि देश-विदेशातील लोकांनी मदत पाठविली. त्यांच्या मदतीवर इंदोरा विहार कमिटीच्या पदाधिकाèयांनी १० एप्रिलपासून भोजन वाटपाला प्रारंभ केला. सकाळ व सायंकाळ जवळपास ५ ते ८ हजार भोजनाचे पाकिट तयार करून ते गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे कार्य लॉकडाऊन संपेपर्यंत केले. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. अहंकारविरहित लहान सेवाही मोठीच असते. संकटकाळात केलेली मानवसेवा त्या अर्थाने मोठीच असल्याचे ते म्हणाले.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा, म्हणजे कुणीतरी तुम्हाला शोधत येईल या उक्तीप्रमाणे विहार कमिटीने केलेली मानवसेवा पाहून मदतीसाठी लोक शोध घेत आले. त्यांच्या मदतीवर लॉकडाऊन संपेपर्यंत मानवसेवा केली. संकटात असाल तेव्हा प्रामाणिक राहा. आर्थिक स्थिती वाईट असेल तेव्हा साधे राहा. अधिकार असतील तेव्हा विनयशील राहा आणि रागात असाल तेव्हा शांत राहा, असा मोलाचा सल्ला ससाई यांनी उपस्थितांना दिला.