
नागपूर – नागपूर मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या कैद्याने अंतर्वस्त्राच्या इलास्टिकचा वापर करून गळफास घेतला. ही घटना उघड होताच तुरुंग प्रशासन आणि पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
मृत कैद्याचे नाव तुलसीराम शेंडे (वय ५४) असून तो गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याच्यावर भंडारा जिल्ह्यात एका खून प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर ३० जून २०२४ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याला नागपूर सेंट्रल जेलमध्ये हलविण्यात आले होते.
ही घटना कारागृहातील ‘छोटी गोल’ विभागातील बैरक क्रमांक ४ च्या मागील बाजूस असलेल्या रंगकाम विभागाच्या गोदामाजवळील खिडकीजवळ घडली. प्राथमिक तपासानुसार, तुलसीरामने आपल्या अंतर्वस्त्राच्या इलास्टिकचा वापर करून फाशी घेतली, अशी माहिती धंतोली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पोलिस विविध शक्यतांचा तपास करत आहेत.
ही घटना समोर आल्यानंतर तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, कैद्यांच्या मानसिक आरोग्याबाबत अधिक संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.