Published On : Wed, Sep 18th, 2019

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वच्छतेला प्राधान्य द्या – संजय धिवरे

नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 63 व्या सोहळ्यानिमित्त ‘दीक्षाभूमी’ येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतांनाच संपूर्ण परिसर स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना उपायुक्त संजय धिवरे यांनी दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आज 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्त पोलिस आयुक्त बी. जी. गायकर, पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर, चिन्मय पंडित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, एन.आर. बुटे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, यांच्यासह महापालिका तसेच शहर पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दीक्षाभूमी येथे दरवर्षीप्रमाणे 7 लाखांपर्यंत अनुयायी उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता व साफसफाई, 24 तास वीजपुरवठा, भाविकांसाठी बसेसची व्यवस्था, औषधोपचार व तात्पुरते दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, अन्नदान वाटप, आग प्रतिबंधक उपाययोजना, होर्डींग व सूचना फलक, नियंत्रण कक्ष, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे अशा विविध सुविधा येथे संबंधित विभागांनी उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश उपायुक्त संजय धिवरे यांनी दिले.

‘दीक्षाभूमी’ येथे दिनांक 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान भाविकांची उपस्थिती राहणार आहे. या दरम्यान तसेच कार्यक्रम समाप्तीनंतर परिसराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उपायुक्त धिवरे यांनी दिल्या. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. तत्पुर्वी संबंधित विभागांनी कार्यक्रमाचे नियोजन करुन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जास्तीत जास्त फिरते शौचालयाची व्यवस्था करावी. अंबाझरी तलाव या प्रेक्षणीयस्थळी यात्रेकरु मोठ्या प्रमाणावर येतात. अंबाझरी तलाव भरलेला असल्यामुळे या परिसरात लाईफ गार्डस् ची बोटीसह व्यवस्था करण्यात यावी. विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याकरिता जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी. तसेच गर्दीच्या वेळी मोबाईल नेटवर्क योग्यरितीने काम करीत नसल्याने पोलिसांसाठी वायरलेस यंत्रणा उपलब्ध करण्यात यावी. आरोग्य विभागाने आजारी व्यक्तींना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका तसेच मुख्य मैदानात विविध ठिकाणी मोबाईल स्ट्रेचरची व्यवस्था करावी.

पोलिस विभागाने पोलिस नियंत्रण व सहाय्यता कक्ष मोबाईल झोन तयार ठेवावे. भाविकांना अन्नदान वाटपामुळे काहीही अनुचित घटना घडू नये, याबाबत संबधित विभागाने विशेष काळजी घ्यावी. आकस्मिक पाऊस, वादळ आल्यास भाविकांची गैरसोय होवू नये, याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुसज्ज राहावे,अशी सूचना त्यांनी दिली.

दीक्षाभूमी येथे 63वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम हा एकदिवसीय अर्थात 8 ऑक्टोबर रोजी असला तरी भाविकांची गर्दी 5 ऑक्टोबरपासून वाढण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळात परिसरात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करु द्याव्यात, असे डॉ. सुधीर फुलझेले यांनी सांगितले.