Published On : Wed, Sep 18th, 2019

5हजार 142 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविणार

नागपूर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना नव्या स्वरुपात राबविण्यात येणार असून विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि हवामान बदलास अतिसंवेदनशील असणारी 4 हजार 210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदी खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील 932 गावे अशा 5 हजार 142 गावांमध्ये हा प्रकल्प (पोकरा) राबविण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज दिली.

रविभवन येथे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (हवामान अनुकूल कृषी प्रकल्प) माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, हवामान बदलांना अनुकूल असा कृषी विकास करुन शेतकरी व एकंदर कृषी क्षेत्रास सक्षम करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना यामध्ये करण्यात येत आहेत. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4 हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे. ही अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रकल्प सुकाणू समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याविषयीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या सुधारणांनुसार, प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांबरोबरच आता 2 ते 5 हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांनादेखील प्रकल्पांतर्गत विविध बाबींसाठी लाभ दिला जाणार आहे. प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्त‍िक लाभाच्या बाबींसाठी अर्थसहाय्याचे प्रमाण 50 टक्क्यांवरुन आता 75 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच 2 ते 5 हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना 65 टक्के अर्थसहाय्य दिले जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकरी गटांना 60 टक्क्यांच्या मर्यादेत अनुदान दिले जाईल.

पोकरा योजनेत गावाचा कायापालट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकही पात्र व्यक्ती त्यापासून वंचित राहू नये, असे आवाहन कृषी मंत्री डॉ. बोंडे यांनी केले.

कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, पोकरामध्ये ३ हजार कोटी निधीतून फळबाग, कुंपण, भूमीहीनांना शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय आदी अनेक बाबीसाठी साह्य, अनुदान मिळते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना खारपाणपट्ट्यात राबविण्यात येत असून, गावाचा कायापालट घडविण्याची क्षमता योजनेत आहे. त्यामुळे या योजनेची भरीव अंमलबजावणी करून त्याचा लाभ अधिकाधिक शेतक-यांना देण्याचे निर्देश शेतकरी बांधव, शेतमजूर तसेच सर्व पात्र गावकऱ्यांना योजनेत लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती मोहीम राबवावी. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश डॉ. बोंडे यांनी दिले. यावेळी शाश्वत सिंचन योजना, फळबाग लागवड योजना आदी विविध योजनांबाबत माहिती त्यांनी दिली.

यापूर्वी अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांपुरता देय असलेला या प्रकल्पाचा लाभ आता 2 ते 5 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.