Published On : Wed, Sep 18th, 2019

मनपाच्या ‘आपली बस’ची माहिती आजपासून ‘चलो ॲप’वर

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे संचालित ‘आपली बस’ची संपूर्ण माहिती आता ‘चलो ॲप’वर मिळणार आहे. याबाबत बुधवारी (ता.१८) आयुक्त अभिजीत बांगर व परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर महानगरपालिका व झोपहोप टेक्नॉलॉजी प्रा.‌लि. यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मनपा उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते व झोपहोप टेक्नॉलॉजी प्रा.‌लि.द्वारा निर्मित ‘चलो ॲप’चे संचालक सुमीत बावा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, हंसा सिटी बस सर्व्हीसेसचे आदित्य छाजेड, आर.के.सिटी बस सर्व्हीसेसचे नीलमणी गुप्ता, ट्रॅव्हल टाईमचे सदानंद काळकर उपस्थित होते.

झोपहोप टेक्नॉलॉजी प्रा.‌लि.द्वारा देशातील २१ शहरांमध्ये ‘चलो’ हे ॲप सुविधा देत असून नागपुरात उद्या गुरूवार (ता.१८) पासून ॲपची सेवा सुरू होईल. उद्या गुरूवार (ता.१९)पासून ॲप न्ड्राईड मोबाईलवर प्ले-स्टोवरुन ‘चलो’ हे ॲप डाउनलोड करता येईल. ‘आपली बस’ने प्रवास करताना इच्छित स्थळी जाणारी बस किती वेळेमध्ये आपल्या जवळच्या शहर बस स्थानकावर येणार आहे याची योग्य माहिती ॲपद्वारे मिळेल त्यामुळे प्रवाशांना आधीच आपल्या प्रवासाबाबत खात्री करता येईल. ‘चलो’ या ॲपमुळे ‘आपली बस’चा प्रवास अधिक सुकर आणि खात्रीशीर होणार आहे.

‘चलो ॲप’ कार्यान्वित करण्याबाबत नागपूर महानगरपालिकेवर कोणतेही आर्थिक भार पडणार नसून यासाठी लागणारे सर्व कॅपीटल कॉस्ट व ऑपरेशनल कॉस्ट हे झोपहोप टेक्नॉलॉजी प्रा.‌लि. यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. ‘चलो ॲप’मुळे मनपाच्या ‘आपली बस’चे संपूर्ण नियंत्रण व अचूक वेळेची माहिती मनपाला उपलब्ध होणार आहे.

‘चलो ॲप’ची वैशिष्ट्ये

· ॲपवर संपूर्ण शहरात संचालित मनपाच्या ३००च्या वर बसेस, त्यांचे लोकेशन व त्यांच्या मार्गाचे विवरण मिळेल.

· प्रवाशांना घरीबसूनच ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी उपलब्ध बसेसची वेळेनुसार माहिती मिळेल.

· ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे त्या बस थांब्याचे नाव ‘सर्च’ केल्यास सदर मार्गावरील सर्व बस स्थानकांची माहिती मिळेल.

· एखाद्या ठिकाणी जायला प्रवाशाला उपलब्ध बसेस, त्या ठिकाणी पोहोचायला लागणारा वेळ, त्यासाठी आकारण्यात येणारे भाडे आदी माहिती क्षणात मिळणार आहे.

· कोणत्या शहर बस स्थानकावर किती बसेस उपलब्ध आहेत व त्या किती वेळेत बस स्थानकावर पोहोचणार आहे याचीही माहिती घरबसल्या उपलब्ध होईल.

· नियमीत रोजच्या बसने प्रवास करणा-या प्रवाशांना त्यांच्या बसच्या लाईव्ह लोकेशनचे नोटीफिकेशनही मिळेल.

· आपली बस’ने प्रवास करताना पुढे येणा-या स्टेशनचे नाव ॲपद्वारे आधीच कळेल.