Published On : Fri, Aug 7th, 2020

‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ देणार पथविक्रेत्यांना बळ

Advertisement

१० हजार रूपये पर्यंत भांडवली कर्ज : मनपाच्या सर्व झोन कार्यालयात विशेष मदत कक्ष

नागपूर : कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या लॉकडाउनमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. व्यवसाय बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अशात पथविक्रेत्यांची उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ (PM SVANidhi) या पथविक्रेत्यांसाठीचया विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी राज्यातही करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या योजनेद्वारे पथविक्रेत्यांना १० हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. जास्तीत जास्त पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे दहाही झोन कार्यालयात विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ ही योजना २४ मार्च २०२० व त्यापूर्वी शहरात पथविक्री करीत असलेल्या सर्व पथविक्रेत्यांना लागू राहिल. विशेष म्हणजे या पथविक्रेत्यांचे ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ या चार प्रवर्गात वर्गीकरण करण्यात आले आहे.

‘अ’ प्रवर्गात महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत यांनी प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र/ओळखपत्र असलेले पथविक्रेत्यांचा समावेश आहे. ‘ब’ प्रवर्गामध्ये महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात आढळलेले परंतू त्यांना विक्री प्रमाणपत्र दिले गेले नाही, अशा पथविक्रेत्यांचा समावेश आहे. ‘क’ प्रवर्गामध्ये नागरी स्वराज्य संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणात जे पथविक्रेते वगळलेले आहेत किंवा ज्यांनी सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरु केली आहे. अशा नगर पथविक्रेत्यांना नागरी संस्थांमार्फत शिफारस पत्र (Letter of Recommendation) प्राप्त झालेले पथ विक्रेते आणि ‘ड’ प्रवर्गात जवळपासच्या विकास/पेरी-शहरी/ग्रामिण भागातील पथ विक्रेते नागरी क्षेत्रामध्ये पथ विक्री करतात आणि त्यास नागरी संस्थांमार्फत शिफारसपत्र (Letter of Recommendation)प्राप्त झालेलेपथ विक्रेते यांचा समावेश आहे.

या योजने अंतर्गत नागरी पथविक्रेते एक वर्षाच्या परतफेड मदतीसह १० हजार रुपये पर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्यांची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. सदर कर्ज विनातारण असेल. विशेष म्हणजे, विहित कालावधीमध्ये किंवा त्यापूर्वी कर्जाची परतफेड करणारे पथविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील खेळत्या भांडवलाच्या कर्जासाठी पात्र ठरतील. व्याजदर बँकांच्या प्रचलित व्याज दराप्रमाणे तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विहित कालावधीमध्ये कर्जाची परतफेड केल्यास ते ७ टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील. व्याज अनुदानाची रक्कम अर्जदाराच्या कर्ज खात्यात तिमाही प्रमाणे जमा केली जाईल. सदर योजनेमध्ये डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना ‘कॅशबॅक’ ची सुविधा त्यांच्या बचत खात्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

असे करा अर्ज
‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेचा लाभ घेण्याकरिता www.pmsvanidhi.mohua.gov.in या संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. जवळच्या नागरी सुविधा केंद्र (CSC Centre) जाऊन ऑनलाईन अर्ज भरावे. पथ विक्रेत्यांना अर्ज भरण्याकरिता त्यांचे मोबाईल क्रमांक हे आधार कार्ड सोबत संलग्न असणे बंधनकारक आहे. तसेच ज्या बँकेत बचत खाते असेल त्या बचत खात्यासोबतही आधार कार्ड व मोबाईल क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करतांना पथविक्रेत्यांना आधार कार्ड, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो तसेच आधार कार्ड सोबत लिंक असलेले मोबाईल क्रमांक सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांनी सदर योजनेची सविस्तर माहिती प्राप्त करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या दाहाही झोन अंतर्गत विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या मदत कक्षाला भेट देऊन शहरातील पथविक्रेत्यांनी या योजनेच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.