Published On : Wed, Sep 1st, 2021

उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही बरे ! – महापौर राखी कंचर्लावार यांचे प्रतिपादन

– आकाशवाणी द्वारे साधला नागरिकांशी संवाद

चंद्रपूर,: पावसाळा आला की डेंग्यू आणि मलेरिया सदृश्य रुग्णांमध्ये वाढ होते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाने केलेल्या उपाययोजना व हाती घेतलेल्या कामांची माहिती चंद्रपूर शहर महापालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी बुधवारी (ता. १) आकाशवाणीवर प्रसारित मुलाखतीद्वारे दिली. तसेच या आजारांना पायबंद घालण्यासाठी ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध केव्हाही बरे!’ असे प्रतिपादन महापौरांनी केले.

महापालिका द्वारे करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सांगताना त्या म्हणाल्या, डेंग्यू व मलेरिया या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी मागील महिनाभरापासून शहर महानगर पालिकेतर्फे प्रत्येक वॉर्डात दररोज डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या घरी असलेल्या कूलरच्या टाक्यांमध्ये ‘अबेट द्रावण’ टाकण्यात येते. लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये डेंगू जनजागृतीसाठी व्यापक कार्यक्रम, गृहभेटी, सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सर्व उपायुक्त, झोन सहायक आयुक्त यांच्यासह स्वतः आकस्मिक भेटी देऊन पाहणी करीत आहेत. तसेच ‘शनिवार माझा कोरडा दिवस’ हे अभियान पाळण्यात येत आहे. सर्वच प्रभागात कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. डेंग्यु चाचणीत पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी व आजुबाजूच्या परिसरात फवारणी करण्यात आली. कोरोना आणि अन्य आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी स्वच्छताविषयक उपाययोजना केल्या जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात रोगराई उदभवू नये, साठी नालेसफाई, गटार स्वच्छता करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली.

घर व परीसरातील पाणी साठ्यात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतल्यास आपण व आपल्या कुटुंबियांना याचा निश्चितच फायदा होईल. या मोहीमेस सहकार्य करून डेंग्युला हद्दपार करण्यास नागरीकांनी सहकार्य केले पाहिजे असे आवाहनही महापौर राखी कंचर्लावार यांनी केले.

महापौरांनी सांगितले की, डेंग्यूला आळा घालणे आवश्यक असल्याने मनपा प्रशासनामार्फत ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. यापूर्वी मनपा प्रशासनामार्फत वेळोवेळी डेंगू संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचना व जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, आता आशा वर्करमार्फत गृहभेटीदरम्यान घरच्या साचलेल्या पाण्यात लार्वा आढळल्यास नोटीस बजावून १००० रुपये दंड करण्यात येत आहे. शनिवारी कोरडा पाळताना आशा वर्करमार्फत घरोघरी सर्वे करण्यात येईल. याशिवाय मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारीसुद्धा प्रत्येकी १० घरी आकस्मिक भेटी देत आहेत. याव्यतिरिक्त शहरातील मोकळे प्लॉट्सवर साफसफाई नसल्यास आणि कचरा आढळल्यास प्लॉट धारकास दंड आकारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.