काँग्रेसच्या पत्रपरिषदेला रोखठोक प्रत्युत्तर
नागपूर : सतत २५ वर्ष नागपूरच्या जनतेने काँग्रेसला सत्तेत राहण्याची संधी दिली. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मंत्रीपदावर राहण्याची सुद्धा संधी मिळाली. आताच्या शहर अध्यक्षांना महापौरही बनविले. मात्र यांना आपल्या काळात जनतेच्या हिताचे एकतरी काम करता आले का? नागपूर महानगरपालिका, केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्यानेच आज नागपूरचा चौफेर विकास झाला आहे. जे लोक हिशेब मागतात त्यांनी त्यांच्या काळात काय केले याचे उत्तर द्यावे. जनतेला काम दिसत आहे, पुढेही शहरात अनेक विकास कामे होणार आहेत. त्यामुळे जनता आरोप करणा-यांना जागा दाखविणारच आहे. सतत २५ वर्ष सत्तेत राहूनही नागपूरच्या जनतेने सलग १५ वर्षापासून काँग्रेसला घरी बसविले व भविष्यातही घरीच बसवतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.
नागपूर शहर काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून रोखठोक उत्तर दिले. ते म्हणाले, विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी यांच्यासारख्या दिग्गजांना केंद्रामध्ये व राज्यात मोठी संधी मिळाली. काँग्रेसचे आताचे शहराध्यक्ष विकास ठाकरे हे नागपूरचे महापौर राहिले. मात्र या काळात काँग्रेसने नागपूरसाठी काय केले? सतत २५ वर्ष सत्तेत राहणा-यांना नाकारत जनताजनार्दनाने भारतीय जनता पक्षाला संधी दिली. मागील १५ वर्षात नागपूर महानगरपालिकेमध्ये आणि पुढे केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर नागपूर शहराचा चहुबाजुने विकास झाला. शहरात नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मेट्रो, एम्स, आयआयएम, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सिम्बॉयसिस, स्नायपर, नॅशनल फायर कॉलेज, नॅशनल लॉ युनिवर्सिटी, स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे केंद्र यासह शहराच्या सभोवताला सिमेंट काँक्रीटच्या रिंग रोडचे जाळे विणले गेले. नागपूर शहराने झपाट्याने विकास साधला, शहराने आज जागतिक यादीत स्थान मिळविले आहे. शहराचा चेहरामोहरा बदलला असून शहराने विकासाची मोठी झेप घेतली आहे, असे सांगतानाच हे २५ वर्षात काँग्रेसला का सुचले नाही, असा घणाघातही ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केला.
काँग्रेसला जनता आणि मतदारांपुढे जाण्याचे नाक तरी आहे का? विकास ठाकरे स्वत: महापौर असताना त्यांनी काय दिवे लावले, हे जनतेला माहित नाही असा त्यांचा समज आहे का? महापौर म्हणून ते एक दिवसही धड सभागृह चालवू शकले नाही. ते नागपूरच्या जनतेला काय न्याय देणार? या अशाच नाकर्तेपणामुळे नागपूरच्या जनतेने एवढे दिवस सत्तेत राहुनही सतत १५ वर्ष ज्यांना घरी बसवले त्यांना भविष्यातही घरीच बसवणार आहे आणि नागपूरच्या सुज्ञ जनतेवर प्रगाढ विश्वास असल्याचे भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रतिपादन केले.










