Published On : Tue, Jun 15th, 2021

वसुंधरा रक्षणासाठी वृक्षपरंपरेचे जतन करा

महापौर दयाशंकर तिवारी यांचे आवाहन : मनपामध्ये वृक्षारोपण

नागपूर : पूर्वी घराच्या अंगणात पिंपळ, वड, चिंच आदी वृक्ष राहायचे. यामध्ये पक्षांचा रहिवास असायचा. नागरिकांनाही सावली मिळायची. मात्र, या झाडांचे महत्त्व आपण विसरलो आहे. त्यामुळेच ही झाडेही लुप्त होत चालली आहे. पृथ्वीवर झाडे राहिली तरच मानव जातीचे अस्तित्व राहिल. त्यामुळे वसुंधरा रक्षणासाठी वृक्षपरंपरेचे जतन करा, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सामाजियक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंगळवारी (ता. १५) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते मनपा मुख्यालय परिसरात दोन पिंपळ वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समता दूत प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी गोडबोले, अल्ताफ कुरेशी, शारदा माकोडे, मंजुषा मडके, अमोल खवशे उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, वृक्ष लागवड ही आपली परंपरा आहे. पिंपळाचे झाडे २४ तासांमधून २२ तास ऑक्सिजन देते. निसर्गातून मिळणारा हा प्राणवायू सर्वोत्तम आहे. झाडांचे उपयोग आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही झाडे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक उपयोगात येतात.

झाडांमुळे सावली मिळते. भूजल पातळीत वाढ होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यात झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी पहिला दौरा रशियाचा केला. त्यावेळी रशियाच्या अध्यक्षांनी त्यांना भारतातून १० हजार पिंपळाची रोपटी आणण्याची विनंती केली. जर रशियाच्या अध्यक्षांना भारतातील पिंपळाच्या झाडाचे महत्त्व माहिती आहे, तर आपण ते का कमी करावे, असा सवाल उपस्थित करीत, वृक्ष लागवडीची ही परंपरा कायम ठेवा. नैसर्गिक प्राणवायूसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करा, असेही ते म्हणाले.