Published On : Tue, Jun 15th, 2021

आता प्रत्येक झोनमध्ये अभ्यासिका

शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांची माहिती

नागपूर: नागपूर शहरातील प्रत्येक झोनमध्ये एक अशा एकूण १० अभ्यासिका साकारण्यात येणार आहेत. शहरातील ज्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी जागा उपलब्ध नाही, त्यांना या अभ्यासिकांचा खूप मोठा फायदा होणार आहे, असा विश्वास शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी व्यक्त केला.

शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने मंगळवारी (ता.१५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये शिक्षण समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, समिती सदस्या परिणिता फुके, संगीता गि-हे, सदस्य मोहम्मद इब्राहिम तौफीक अहमद, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे, राजेंद्र सुके, सुभाष उपासे, मनपा शिक्षण विभागातील सर्व शाळा निरीक्षक व विनय बगले यांच्यासह ऑनलाईन माध्यमातून उपसभापती सुमेधा देशपांडे व क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर उपस्थित होते.

शहरात प्रत्येक झोनमध्ये एक अभ्यासिका तयार करण्याच्या प्रस्तावाला बैठकीमध्ये सदस्यांमार्फत मंजुरी प्रदान करण्यात आली. काही झोनमध्ये आधीच अभ्यासिका असून त्यामध्ये सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे जुन्या अभ्यासिकांची दुरूस्ती करून त्यामध्ये आवश्यक सुविधा पुरविण्याची सूचना यावेळी उपसभापती सुमेधा देशपांडे यांनी केली. ज्या झोनमध्ये आधीच अभ्यासिका आहेत तेथे सुविधांची व्यवस्था व योग्य संचालन करून जिथे अभ्यासिका नाही तिथे नव्या निर्माण करण्यात येणार असल्याचे शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त मनपाच्या बंद असलेल्या इमारतीमध्ये खासगी संस्थांची मदत घेउन ७५ शाळा विकसीत करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त शहरात ७५ शाळा विकसीत करण्याची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. या शाळांमध्ये अधिकाधिक शाळा इंग्रजी माध्यमाच्या असाव्यात यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. या शाळांचे व्यवस्थापन मनपाकडे राहणार असून त्या विकसीत करण्याचे कार्य संबंधित संस्थांचे असणार आहे. या सर्व शाळा कशा संचालित करण्यात याव्यात, त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा या सर्व बाबींचे प्रारुप तयार करण्यात येणार असून यासाठी सर्व सदस्यांनी सूचना देण्याचे आवाहन शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी केले आहे.

येत्या २८ जूनपासून शहरातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहणार आहे. मात्र शहरातील शाळा सुरू करण्याबाबत शाळांची तयारी, पहिल्या दिवसापासून प्रत्येक शाळेचे नियोजन करून शैक्षणिक कार्य सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण समिती सभापतींनी प्रशासनाला दिले.

याशिवाय शहरातील प्रत्येक मतदार संघात सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यास्तव झालेल्या कार्यवाहीची माहिती, २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता मनपा विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वाटर बॉटल वितरीत करण्यासंबंधी केलेल्या कार्यवाहीची माहिती, माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रक्रियेत किती शिक्षक कार्यरत आहे व किती शिक्षक सेवानिवृत्त झाले तसेच किती शिक्षकांना रिक्त जागेवर नियुक्ती देण्यात आली व किमी जागा रिक्त आहेत याबद्दल सविस्तर माहिती सादर करणे, या सर्व विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.