महापौर दयाशंकर तिवारी यांचे प्रशासनाला निर्देश : संजय बालपांडे यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा
नागपूर : नागपूर महानगरपालिका प्रशासनाने विकसित झोपड्पट्ट्यांचे डिनोटिफिकेशन करण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला पाठवावे, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी ज्येष्ठ नगरसेवक संजय बालपांडे यांच्या द्वारे विचारलेल्या प्रश्नावर दिले. सध्याच्या नियमात स्लम डिनोटिफिकेशन करण्याचे कोणतेही अधिकार नाही. नागपूर शहरातील अनेक स्लम वस्त्यांचा संपूर्ण विकास झाला आहे, आता या वस्त्या स्लम मध्ये असल्या पाहिजे किंवा नाही याचा विचार करून त्यांना डिनोटिफाय करावे, असेही ते म्हणाले.
मनपाच्या सर्वसाधारण सभेचे ऑनलाईन आयोजन मंगळवारी (ता.२५) करण्यात आले होते. या सभेत संजय बालपांडे यांनी घोषित झोपडपट्टी क्षेत्रामध्ये बांधकामाच्या परवानगीकरिता नकाशा डी.सी.आर. प्रमाणे सादर करणे बंधनकारक आहे का, असा प्रश्न विचारला होता. यावर आमदार आणि नगरसेवक प्रवीण दटके यांनी एक बैठक आयोजित करून या प्रश्नावर सांगोपांग चर्चा करण्याचे सुचविले. सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी सांगितले की, नागपुरातील स्लम वस्त्यांचा विकास झाला आहे तरीपण या वस्त्या अजूनही स्लम वस्त्या म्हणूनच घोषित आहेत. यांना डिनोटिफाय करण्याची कोणतीही तरदूद नाही आहे.
चर्चेअंती महापौरांनी निर्देश दिले की, ज्या अधिकाऱ्याला स्लमचा अधिकार दिला आहे. त्याच्या नावाने गॅजेट नोटिफिकेशन निघाला नाही, याचा अर्थ असा आहे की, तो अधिकारी अधिकार नसताना काम करीत आहे. या अधिकाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात यावे, असेही त्यांनी निर्दशित केले. रमाई घरकूल योजनेअंतर्गत बांधकाम करण्याची परवानगी देण्यात येते. त्या धर्तीवर स्लम वस्त्यांमध्ये बांधकामाची परवानगी देऊ शकतात काय, याचा सुद्धा विचार करावा. त्यांनी विकसित झालेल्या वस्त्यांना स्लम मधून काढण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला पाठवावा, असेही महापौर म्हणाले.