सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेतील समिती अहवालातील निष्कर्ष
नागपूर: नागपूर महानगरपालिकेसोबत झालेल्या करारानुसार ए.जी. एन्व्हायरो आणि बी.व्ही.जी. या दोन्ही कंपन्यांकडून कचरा संकलन व परिवहनाचे काम समाधानकारक नाही. कचरा संकलन सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असून यात नियमितता असणे आवश्यक आहे. कचरा संकलनासाठी मनपाद्वारे नियुक्त दोन्ही एजन्सीच्या कामामध्ये नियमितता नसल्यामुळे या दोन्ही एजन्सींऐवजी तीन महिन्याच्या आत नवीन एजन्सी नियुक्त करण्यात यावी, असा निर्ष्कष ए.जी. एन्व्हायरो आणि बी.व्ही.जी. या दोन्ही कंपन्यांच्या कार्यप्रणालीबाबत येणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत गठीत समितीच्या अहवालात देण्यात आलेला आहे.
सत्तापक्ष नेत्यांच्या अध्यक्षतेतील समितीचा अहवाल सभागृहापुढे आल्यानंतर मंगळवारी (ता.२५) महापौर दयाशंकर तिवारी यांनी तो अहवाल मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे सुपूर्द केला. या अहवालाच्या अनुषंगाने २९ जानेवारी रोजी मनपाच्या सभागृहात चर्चा केली जाणार आहे.
सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत गठीत समितीमध्ये आरोग्य समिती सभापती महेश महाजन, नगरसेवक नितीन साठवणे यांचा समावेश आहे.
ए. जी. एन्व्हायरो आणि बी. व्ही. जी. या दोन्ही कंपन्यांच्या कार्यप्रणालीबाबत मनपाकडे अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी कचऱ्यामध्ये माती मिसळली जात असल्याचे आरोप करीत त्याचा व्हिडिओ सादर केला होता. त्याअनुषंगाने समितीद्वारे सर्वकष चौकशी करण्यात आली. टिप्पर मालक, चालक, जे.सी.बी. चालक या सर्वांची साक्ष नोंदविण्यात आली. याशिवाय विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी दोन्ही एजन्सीमधील कर्मचारी भरती संदर्भात मनपाच्या सभागृहात विषय उपस्थित केला होता. या सर्व विषय आणि येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने समितीद्वारे सखोल चौकशी करण्यात आली. यामध्ये सर्व नगरसेवकांचे अभिप्राय मागविण्यात आले. यासाठी आरोग्य समिती सभापती महेश महाजन आणि तत्कालीन उपायुक्त राजेश भगत यांच्या उपस्थितीत सर्व झोन कार्यालयांमध्ये नगरसेवकांच्या बैठक घेउन त्यांचे कंपनीच्या कार्यप्रणालीवर लेखी अभिप्राय मागविण्यात आले. याशिवाय सर्व झोनच्या सभापतींना समितीपुढे आमंत्रित करून त्यांचेही अभिप्राय नोंदविण्यात आले. सर्व सहायक आयुक्तांनीही समितीपुढे एजन्सीच्या कामाबाबत आपले मत नोंदविले.
एकूणच सर्व बाजूंचा विचार करून त्यावर सविस्तर चर्चा करून समितीद्वारे अंतिम अहवाल सादर करण्यात आला व तो सभागृहापुढे ठेवण्यात आला. ए.जी. एन्व्हायरो आणि बी.व्ही.जी. या दोन्ही कंपन्यांनी करारनाम्याचा भंग केल्याचे समितीने अहवालात सांगितले आहे.

