मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी ‘सकल मराठा समाजाच्या’ वतीने दि.९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या राज्यव्यापी मोर्चाची तयारी पुर्ण झाली असून या मोर्चामध्ये संपुर्ण राज्यातून तसेच राज्याबाहेरुन लाखो मराठा बांधव सामील होणार असल्याची माहिती मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक विरेंद्र पवार यांनी दिली आहे.
या मोर्चाच्या तयारी विषयी बोलताना पवार म्हणाले ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता भायखळा येथील “जिजामाता उद्यान’ ते ‘आझाद मैदान’ असा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्यासाठी संबधित यंत्रणाकडे अर्ज करण्यात आले असून त्यापैकी महत्वाच्या परवानग्या मिळालेल्या आहेत. मोर्चातील सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘मराठा मेडिको असोशिएशन’, महापालिकेचे डॉक्टर्स , अॅम्ब्युलन्स व इतर वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
मुंबई बाहेरुन येणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘रेल मराठा स्वयंसेवक’ हे प्रत्येक स्टेशनवरती स्वयंसेवक म्हणून कार्यरत असणार आहेत. पुणे मार्गे मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी पनवेल, कामोठे, खारघर, बेलापूर, जुईनगर, सानपाडा, वाशी तसेच ठाणे अक्ट्रॉय नाका, भाईंदर या ठिकाणी विशेष सोय करण्यात आली आहे.
त्याच बरोबर मोर्चासाठी बाहेरुन येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची सोय मुंबईतील ‘बीपीटी सिमेंट यार्ड’ व ‘वडाळा ट्रक टर्मिनल’ येथे करण्यात आली आहे. तसेच मोर्चातील आवश्यक सेवांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचे संयोजक विरेंद्र पवार यांनी दिली आहे.












