नागपूर : यंदा १५ ऑक्टोबरला नवरात्रोत्सवास सुरुवात होणार असून यादरम्यान ९ दिवस दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या ९ स्वरूपाची पूजा केली जाते. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्तिकार, विक्रेत्यांची उत्सवाची अंतिम तयारी टप्प्यात पोचली आहे. देवीच्या विविध प्रकारच्या मूर्ती बाजारपेठेत दाखल होण्यासाठी सज्ज झाल्या असून देवीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवत सजावट आणि रंग-रंगोटी करत आहेत.
गणेशोत्सवानंतर भक्तांना ओढ नवरात्रोत्सवाची असते. त्यासाठी देवीच्या मूर्तिकारांची लगबग सुरू झाली असून, ग्राहकांची जास्त मागणी असलेल्या मूर्ती साकारण्याकडे मूर्तिकारांनी लक्ष केंद्रित केले आहे.
नागपुरात नवरात्रोत्सवादरम्यान सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घटस्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तिकारांकडून देवी मूर्ती साकारण्याचे काम झापत्याने सुरु आहे.
दरम्यान नवरात्रोत्सव वर्षातून दोनदा येतो. एक चैत्र नवरात्र आणि अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात जी ऑक्टोबर महिन्यात येते. या ९ दिवसांसाठी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची विशेष पूजा केली जाते आणि विजयादशमीच्या दिवशी शारदीय नवरात्रीची समाप्ती होते. यावेळी दुर्गा माता हत्तीवर स्वार होत आहे. हे खूप शुभ मानले जाते.