नागपूर: नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या पिवळी मारबत उत्सवाच्या तांडापेठ येथील मंडपाला प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे तसेच अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी दोघांनी मारबतचे विधिवत पूजन केले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या मारबत व बडग्या महोत्सवाची तयारी सुरू आहे. महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन आणि क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांच्या देखरेखीखाली महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे.
स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांच्या संकल्पनेतून मनपाच्या वतीने मारबत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांनी तांडापेठ येथील पिवळी मारबत मंडपाला भेट दिली.
भेटीदरम्यान क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, नगरसेवक संतोष (रामभाऊ) अंबुलकर, मनपाचे अधिकारी व कर्मचारी, मारबत उत्सवाशी संबंधित पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
नागपूरच्या लोकपरंपरेचा अविभाज्य भाग
तांडापेठ येथील नागोबा मारबत देवस्थान – तर्हाणे तेली समाजाच्या वतीने दरवर्षी पिवळी मारबत उत्सवाचे आयोजन केले जाते. नागपूरच्या समृद्ध लोकपरंपरेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या या उत्सवाला शहराच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे.
यावेळी प्रवीण तरडे यांनी पिवळी मारबतची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा, उत्सवाचे महत्त्व आणि नागपूरच्या लोकसंस्कृतीतील त्याचे स्थान याबाबत माहिती जाणून घेतली. या ऐतिहासिक परंपरेचे जतन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
यानंतर प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांनी पिवळी मारबतचे विधिवत पूजन करून उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.

नागपूरच्या लोकपरंपरेचा अविभाज्य भाग


