Published On : Thu, Nov 7th, 2019

आमदार कृष्णा खोपडे यांनी घेतलेल्या बैठकीचे पडसाद, स्मार्ट सिटीच्या कामाला वेग

Advertisement

बाधितांना मोबदला, पहिली किश्त खात्यात जमा, अतिरिक्त पुनर्वसन लाभ देखील मिळणार

नागपूर : आमदार कृष्णा खोपडे यांनी नुकतेच मनपा आयुक्त, स्मार्ट सिटीचे सी.ई.ओ. रामनाथ सोनवणे व अन्य अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीचे पडसाद म्हणून सर्व अधिकारी कामाला लागले आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या कामाला सुद्धा वेग आलेला असून भरतवाडा ते कळमना मार्केटच्या रस्त्यामध्ये प्रकल्प बाधित असलेल्या मालमत्ता धारकांना मोबदल्याचे पत्र आमदार कृष्णा खोपडे यांचे हस्ते, स्थानीय नगरसेवक व अधिकाऱ्यांचे उपस्थितीत बाधितांना देण्यात आले.

प्रकल्प बाधितांमध्ये राजनाथ साहनी, मालतीबाई साहू, राजुसबाई व अमोल वैरागडे, रमेश झाडे, रोहित जेठूमल, संत्रू व राधे खिसाग्रा यांना रु.2249/- प्रती चौ.फुट बांधकाम या दराने अनुक्रमे 12.74 लक्ष, 10.05 लक्ष, 11.49 लक्ष, 4.74 लक्ष, 30.21 लक्ष, 9.73 लक्ष इतका निधी नुकसानाचा मोबदला म्हणून मंजूर केला असून हा मोबदला एकूण तीन किश्तमध्ये देण्यात येईल. याची पहिली किश्त बाधितांचे खात्यात वळते करण्यात आली असून या व्यतिरिक्त पुनर्वसन लाभ म्हणून अतिरिक्त निधी सुद्धा यांना देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी भवानी मंदिर रोडमध्ये बाधितांना देखील याच दराने मोबदला देण्यात आला आहे.

आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले कि, मागील काळात अनेक पक्षातील राजकीय लोकांनी स्मार्ट सिटी पिडीतांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ‘ज्याची जागा जाईल, त्यांना मोबदला मिळणार नाही. घरे तोडून स्मार्ट सिटी बनविणार’. अशा प्रकारची दिशाभूल करणारी बेताल वक्तव्ये करून आपली राजकीय पोळी शेकण्याचा धंदा काही राजकीय पक्षाच्या लोकांनी चालविला होता. मात्र कोणत्याही राजकीय पक्षासोबत संलग्न नसलेल्या विकल्प सामाजिक संस्था, सारख्या काही गैरशासकीय सामाजिक संस्था (एन.जी.ओ.) स्मार्ट सिटी बद्दल नागरिकांत असलेला गैरसमज दूर करण्यास सरसावल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम देखील दिसून येत आहे. अंशत: असो कि पूर्णत: सर्वच बाधितांना चांगल्या दराने मोबदला मिळत असल्यामुळे अनेक बाधितांचे गैरसमज यातून दूर झालेले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी स्मार्ट सिटीच्या भूमिपूजन प्रसंगी कोणाचेही नुकसान या प्रकल्पात होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले होते. त्यांचा एकूण एक शब्द पाळला जात असून प्रत्येक बाधितांना मोबदला देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात स्मार्ट सिटीच्या प्रती सकारात्मकता दिसून येत असून या महत्वाकांक्षी प्रकल्प साकारण्याच्या दिशेने शुभ संकेत आहे. येत्या काळात प्रमुख रस्त्याची कामे पूर्ण होताच, नाग नदीवरील ब्रिज, फायर स्टेशन, दर्जेदार शाळा, स्मार्ट पोलीस स्टेशन, अत्याधुनिक सुविधायुक्त हॉस्पिटल, उद्याने, ई-लायब्रेरी व अन्य दर्जेदार सुविधा त्याचप्रमाणे गडरलाईन, पिण्याचे पाण्याची लाईन, घरगुती गॅसेसची पाईपलाईन व अन्य मुलभूत सुविधा या सर्व कामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.

यावेळी लकडगंज झोनचे सभापती राजकुमार सेलोकर, नगरसेविका मनिषा अतकरे, डॉ.प्रकाश गांधी, आरती पंखराज, निकिता गायकवाड, शिल्पा तालेवार, मनिषा ठाकूर, डॉ.संदीप नारनवरे, सुशिल बारई, सुरज पांडे आदी उपस्थित होते.